कलर्सचा चौका
आपण एवढे कपडे इतकी र्वष झाले खरेदी करतोय. पण कुठल्या रंगाचे कपडे कसे निवडायचे याचं एक बेसिक सूत्र असतं, तेच कधी समजून घेत नाही.
ते सूत्र फक्त लक्षात ठेवा, तुमची रंगाची निवड चुकण्याची शक्यता अत्यंत कमी होईल.
रंगांचे एकूण चार प्रकार लक्षात ठेवायचे.
1) मुख्य रंग
- असे रंग जे प्युअर फॉर्ममध्ये असतात. त्यात काही मिलावट नसते. तो म्हणजे तोच एक रंग.
2) टीण्ट - म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर पेस्टल कलर्स. म्हणजे कुठल्याही मेन कलरमध्ये थोडासा पांढरा रंग कालवला तर जी शेड येते तो हा टीण्ट कलर.
3) शेड - म्हणजे कुठल्याही मुख्य रंगात थोडा ब्लॅक-काळा रंग अॅड केला की जी शेड येते, ती ही.
4) न्युट्रल - म्हणजे काळा, पांढरा, आयव्हरी असे रंग जे न्युट्रल कलर मानले जातात.
कुठल्या ऋतूत कुठला रंग?
ऋतुमानानुसार कपडे घालणं ही काही फक्त फॅशन नाही, तर त्या त्या ऋतूतली कलर थेरपी म्हणून, आपला मूड मस्त रहावा म्हणूनही त्या त्या रंगांचे कपडे घालणं आवश्यक ठरतं. मुख्य म्हणजे जो त्या ऋतूचा रंग असतो त्या रंगाचे कपडे वापरायचे नाहीत, हा पक्का नियम.
आता आपण एकाच पिवळ्या रंगाचं उदाहरण घेऊन त्याची कुठली शेड कधी चांगली दिसते असं सूत्र घेत ही रंगसंगती जरा समजून घेऊ.
पावसाळा आणि ब्राईट यलो
पाऊस, कुंद हवा, मंद वातावरण असा एकूण मोसम असतो. त्यात किती किती दिवस अनेकदा सूर्यदर्शन होत नाही. म्हणून मग आपण ब्राईट यलो अर्थात पिवळ्या धम्म रंगाचे कपडे वापरावेत या काळात. त्यानं आपलाही मूड एकदम फ्रेश होतो.
हे झालं एक उदाहरण पण पावसाळ्यात कपडय़ांचा रंग ठरवतानाचा नियम एकच, कुठलाही न्युट्रल कलर + कुठलाही ब्राईट कलर असं कॉम्बिनेशन हमखास चांगलं दिसतं.
हिवाळ्यात क्रोम यलो
हिवाळा, थंडीगारठा. आपल्याला उबदार कपडय़ांची गरज असतेच. याकाळात पिवळ्यातली डार्क क्रोम यलो ही शेड वापरावी. हा रंग उष्णता शोषून धरतो, त्यामुळे उबदारही वाटतं. ज्या रंगात काळा मिक्स असेल असे ‘शेड’ कलर्स + न्युट्रल कलर्स हिवाळ्यात उत्तम. विशेषत: लाल, नारंगी आणि पिवळा हे वॉर्म कलर्स हिवाळ्यासाठी एकदम खास.
समरमध्ये पेल यलो
उन्हाळा ऊन तापलेलं, त्यात ब्राईट यलो घातला तर कसं वाटेल? म्हणून उन्हाळ्यात पेस्टल शेडस् वापराव्यात. ते डोळ्याला सुखकारक वाटतात. म्हणजेच काय तर न्युट्रल कलर्स+टीण्ट म्हणजे पांढरा मिक्स केलेले रंग उन्हाळ्यात वापरणं उत्तम. त्यातही ब्ल्यू, व्हायलेट आणि ग्रीन सगळ्यात छान.