प्रसाद ताम्हनकर
चायनीज सेल्फ ड्रायव्हिंग डिलिव्हरी स्टार्टअप ’निओलिक्स’ वुहानमध्ये वैद्यकीय पुरवठा करण्यासाठी तसेच रस्ते र्निजतुक करण्यासाठी आपली सेल्फ ड्रायव्हिंग व्हॅन वापरत आहे. ह्या संकल्पनेला उत्तम प्रतिसाद मिळत असून, कंपनीने आता चक्क अजून 200 व्हॅन्सची ऑर्डरदेखील मिळवली आहे. ह्या सेल्फ ड्रायव्हिंग व्हॅनचा उपयोग बघता, चायनीज सरकार ह्या गाडय़ांसाठी आता सबसिडीदेखील देण्यास तयार झाले आहे. सेल्फ ड्रायव्हिंग कारचे तंत्नज्ञान किती उपयुक्त ठरू शकते हे पाहिल्यानंतर, चीन सरकारने डिलिव्हरी व्हॅन खरेदी करणो व त्या चालविण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही सबसिडीची योजना आणली आहे; किमतीच्या तुलनेत 60 टक्के. हे लक्षात घेऊन, निओलिक्सने तर वर्षाच्या अखेरीस 1000 व्हॅन तयार करून त्यांची विक्री करेल अशी अपेक्षा आहे. ह्यापूर्वी कंपनीने 2019 पासून फक्त 125 गाडय़ांचे उत्पादन केले होते. हे बघता आता ह्या कंपनीला खरेच अच्छे दिन आलेत म्हणायला हरकत नाही. कंपनी ह्यासाठी तब्बल 29 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक वाढवत आहे. ह्या सेल्फ ड्रायव्हिंग कारमुळे कार्बनचे उत्सर्जनदेखील आटोक्यात येईल असा कंपनीचा दावा आहे.
( प्रसाद मुक्त पत्रकार/तंत्रज्ञानविषयक लेखक आहे.)