शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

साजरं करण्याची शर्यत

By admin | Updated: February 22, 2017 14:55 IST

घटना कुठलीही असो,प्रसंग कोणताही असो, तो ‘साजरा’ करण्याचं वेडच आपल्याला लागलंय.

घटना कुठलीही असो,प्रसंग कोणताही असो, तो ‘साजरा’ करण्याचं वेडच आपल्याला लागलंय.जणू आत्ता येणारा सण जगबुडीच्या आधीचा शेवटचा आहे!‘लग्न ठरले’, ही दवंडी पिटवणारे आता बाळाच्या आगमनाची वर्दीसुद्धा तशीच देऊ लागलेत.आपल्या आयुष्यात येणारे वेगवेगळे क्षण अनुभवायचे की, त्या नावानं कलकलाट करीत राहायचा? 

नववर्ष झाले, व्हॅलेण्टाइन डे ही झाला.. त्यांच्या शुभेच्छांचे फोटो डिलीट करकरून आपले हात दुखले. लोकांनी संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या एकमेकांना. आता उद्या महाशिवरात्र. त्याच्याही शुभेच्छा येतीलच...आपण भारतीय उत्सवप्रिय आहोत हे मान्य; पण हल्ली होतंय काय की, कोणीतरी दरादरा आपल्याला या सणांपासून दुसऱ्या सणांमध्ये खेचतंय असं वाटतं. हे कमी म्हणून फेसबुकचा अखंडित अभिषेक.. दणदण आदळणारे फोटो.. त्याला लाइक करा, शेअर करा हे सांगणारे मेसेज...साधारणपणे गणपती आले की माझं एक सकाळचं काम वाढतं. वर्तमानपत्राच्या रंगीत जाहिराती, पुरवण्या बाजूला करणं. त्यांच्यातून वाट काढत बातम्या वाचाव्या लागतात. जे वर्तमानपत्राच्या बाबतीत तेच टेलिव्हिजनवर, तेच बाहेर बाजारात. आत्ता येणारा सण हा जगबुडीच्या आधीचा शेवटचा आहे आणि त्यासाठी चला साजरा करा अशी हाकाटीच जणू. गणपती होतो ना होतो तोच नवरात्र. ते झालं की दिवाळी. नंतर ख्रिसमस. वर्षाअखेरचा ३१ डिसेंबर. पाडवा. होळी. हे कमी म्हणून की काय लग्न, वाढदिवस, पार्ट्या आहेतच.मधे व्हॉट्सअ‍ॅपवर एक संदेश फिरत होता.. ‘दिवाळीचे मेसेज डिलीट करायला माणूस पाहिजे’. विनोदाचा भाग जरी वगळला तरी हा साजरा करण्याचा अतिरेक सध्या होत आहे, असं वाटत नाही का?माणसाला रोजच्या धबडग्यातून विरंगुळा मिळावा म्हणून हे सण-उत्सव आले. नैमित्तिक कार्य करून कंटाळलेल्या जिवाला थोडी करमणूक. पण सध्या झालंय काय की, हा उत्सवाचा भस्मासुर मोकाट सुटलाय. सण सोडा अगदी कौटुंबिक समारंभसुद्धा आपण दे मार साजरे करायला लागलो आहोत. लग्नसोहळे, हनिमून, वाढदिवस.. सगळं कसं दणक्यात... आधी लग्न जुळवायला पत्रिका बघायचे, नंतर लग्न ठरायचे. आता आधी इव्हेण्ट मॅनेजर आणि कन्सेप्ट ठरवतात आणि मग बोलणी. अशी उत्साही जोडपी आहेत जी यासाठी स्वतंत्र फेसबुक पेज करतात. यू-ट्यूबचं चॅनल तयार होतं आणि असं सर्व करून देणारे लोकही आहेत. या तऱ्हेने करा.. एवढे लाइक्स हमखास... तमुक करा.. इतके फॉलोअर्स आहेतच...सोशल मीडियामुळे हे साजरे करण्याची प्रवृत्ती वाढलीय, की साजरे करण्याच्या हव्यासामुळे अशी नवनवीन माध्यमं येत आहेत? कोंबडी आधी की अंडं, असा प्रश्न आहे हा. साधारणपणे सात-आठ वर्षांपूर्वी घडलेला एक प्रसंग स्पष्ट आठवतोय. मुंबईतल्या एका उत्सवाला गेले होते. म्हणजे अनेक वर्षे जातच होते.. तशीच गेले होते. काही वेगळी शिल्पं.. चित्रांचं प्रदर्शन.. स्टॉल्स.. मस्त माहोल होता. सुरुवातीलाच एक मोठ्ठं शिल्प होतं. धातूच्या डब्यापासून केलेलं. बरंच वाचलं होतं त्याबद्दल म्हणून पाहायचं होतं. पण काय बिशाद तेथपर्यंत पोहोचायची! अनेक हौशी गर्दी करून फोटो काढत होते. स्वत:च्या डोळ्याने पाहण्याआधी कॅमेऱ्याच्या डोळ्याने बघण्याची घाई. आमच्यासारख्या फक्त बघणाऱ्यांना उभं राहायलाही वाव नव्हता. आधीच आपल्याकडे सार्वजनिक शिस्तीचा अभाव त्यात आणखीन भर. लग्नसमारंभातही बोहोल्यापुढे मोबाइल घेऊन ही गर्दी. बसलेल्या लोकांना, ज्येष्ठ नागरिकांना काही दिसायची सोय नाही आणि फोटो काढल्यावर अपलोड करायची घाई. नंतर लाइक्स मिळवायची धडपड... अरे, हे साजरं करणं आहे की शर्यत? आपले आयुष्यातले हे क्षण अनुभवायचे की त्यांच्या नावाने बोंबलत सुटायचं? कुठेतरी तारतम्य सुटत चाललंय हे खरं. लग्न ठरलं, ही दवंडी पिटवणारे आता बाळाच्या आगमनाची वर्दीसुद्धा तशीच देऊ लागलेत. वी आर अ‍ॅट डॉक्टर.. हा पाहा बाळाचा सोनोग्राफी फोटो... (खोटं नाहीये, प्रत्यक्ष पाहिलंय!) आपलं आयुष्य कसं जगायचं, हा प्रत्येकाचा अगदी वैयक्तिक प्रश्न आहे. कोणाला कशातूनही आनंद मिळू शकतो. पण हे असं आभासी जग क्रिएट करून त्यातच मश्गूल राहणं याला निव्वळ वेडेपणा म्हणता येईल. जरा आजूबाजूला पाहिलं तर असे वेडे असंख्य मिळतील. ट्रेनमध्ये, कॅफेत, रेस्टॉरंटमध्ये, कामाच्या ठिकाणी.. मग हातात वडापाव असो वा स्टारबक्सची कॉफी.. मला हे अपलोड करायलाच हवं ही घाई... हा उन्माद पर्यटनाला गेलं की प्रकर्षाने जाणवतो. माझ्यासारखे ठरवून मोबाइल बंद करणारे लोक फार कमी असतात. सराईत, कसलेले छायाचित्रकारही लगेच ओळखू येतात. पण लक्षात राहतात ते हे ‘साजरेकर’. मी यांना हेच नाव ठेवलंय. या साजरेकरांचा आता खरंच अतिरेक होतोय. म्हणजे तो सण परत येणारच नाही अशा भावनेनं सगळं चालतं. सण असो, समारंभ असो, पर्यटन असो.. प्रत्येक गोष्टीचा मूळ गाभाच हरवतोय. आपल्याला यातून काय मिळाले यापेक्षा आपण हे करतोय, असं वागतोय.. अमुक गोष्ट आपल्याकडे आहे याची जाहीर दवंडी पिटवणं ही वृत्ती अगदी सर्रास आढळतेय. फोटो काढू नये किंवा सोशल मीडिया वापरू नये, अशी टोकाची भूमिका अजिबात नाही. आपण समाजात राहतो. सोशल मीडियामुळे संपर्क साधणं सोपं झालंय.. पण आपण समाजाभिमुख झालोय का? फार वर्षांपूर्वी दसऱ्याला, संक्रांतीला लोक संध्याकाळी आवर्जून निदान शेजाऱ्याकडे जायचे... आता एका क्लिकमध्ये सोसायटी काय, अख्ख्या शहराला तिळगूळ वाटता येतो. याला उत्सव म्हणायचं का? हा उत्सव नाही एक प्रकारचा गुंगी आणणारा उन्माद आहे. प्रत्येक घडामोडीचे फायदे-तोटे असतात. जरा डोळसपणे बघण्याची गरज आहे. आधीच्या पेक्षा आत्ताचं आयुष्य प्रगत झालंय, आधुनिक झालंय; पण आपण त्यात आपला खरा संवाद, अर्थ विसरत चाललोय का? सेलच्या खंडीभर जाहिराती पाहून लगेच अधाश्यासारखी खरेदी केली. फॅशन आहे म्हणून त्याची मोठी जाहिरात करून आपण नक्की काय साधतोय? साजरे करतोय की चरफडतोय?वर्तमानपत्रातून, टीव्हीवरून जाहिराती होणार, मारा होणार, अनेक नवनवे फॅड येणार, अनेक उत्सव, महोत्सव होणार, मैफली सजणार.. प्रश्न आहे तो हा की, आपल्याला त्यातून नक्की आनंद मिळतोय का? मी खूश आहे, आनंदी आहे हे ओरडून का सांगावं लागतंय? मग ते लग्न असो वा वाढदिवस.. गृहशांती असो वा डोहाळजेवण... इंग्रजीत एक वाक्प्रचार आहे, ‘प्रॉब्लेम आॅफ प्लेण्टी..’ म्हणजे सुबत्तेचे दुष्परिणाम... जग जवळ आलंय पण माणसे लांब गेलीत. मला भूतकाळचे गोडवे अजिबात गायचे नाहीत. आधी किती छान होतं हे तर मुळीच म्हणायचं नाही. सांगायचंय एवढंच की, आपलं तारतम्य तर सुटत नाहीये ना? आपण हे जे काही साजरं करतोय ते नक्की कशासाठी? आणि यातून खरोखरचा आनंद आपल्याला मिळतोय का? सर्वांना खरोखरच जर इतका आनंद मिळत असता तर मानसिक रुग्णांच्या संख्येत दरवर्षी वाढ झाली नसती. जागोजागी थेरेपी सेंटर्स उगवलेली दिसली नसती. तंत्रज्ञान हे माणसानं निर्माण केलं आहे आणि त्याला काही एक जबाबदारीनेच वापरायला हवंय. बेगडी, दिखाऊ उत्सवाचा सोस सोडून दुसरे काही अधिक समृद्ध करणारे पाहायला हवंय. ‘शेजारणीने घातली सरी’ ही वृत्ती बरोबर नाही. मी फोन वापरणारच नाही आणि सोशल मीडियावर जाणारच नाही हा हटवादीपणा झाला. आपल्याला आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे पण आपलं तारतम्य वापरून..जाहिरातींच्या या चकचकीत युगात, फेसबुक, टिष्ट्वटरच्या आभासी दुनियेत, मोठमोठी दुकाने, मॉल्सच्या झगमगटात, अनेक समारंभांच्या, सणांच्या रोषणाईत, जल्लोषात आपण आपला विवेक हरवू न देणं महत्त्वाचं. आपण हे जे करतोय/करतेय ते कोणासाठी? आणि त्याची किती गरज आहे, एवढा साधा प्रश्न स्वत:ला विचारला तरी पुरे. उत्तर मात्र प्रामाणिक हवं..सण, समारंभ, उत्सव नक्की साजरे करावेत, पण सोसेल तेवढेच..(लेखिका मुक्त पत्रकार आणि स्त्रीमुक्ती चळवळीत कार्यरत आहेत.shubhaprabhusatam@gmail.com)