- प्रशांत परदेशी
( लेखक दुर्गप्रेमी गिर्यारोहक आहेत.)
नव्या वर्षाचं स्वागत कसं करावं?
सर्वोच्च ठिकाणी एखाद्या डोंगर कपारीत,
गुहेत किंवा मंदिरात,
एखाद्या नदीच्या खो:यात मुक्काम करावा,
सवंगडय़ांसोबत किस्स्यांची मैफल जमवावी,
सरणा:या वर्षाचा हिशेबठिशेब मांडावा,
नवा संकल्प सोडावा
आणि डोंगरावरची मंतरलेली पहाट,
सूर्योदयाच्या साक्षीने नव्या वर्षाचं स्वागत करावं.
नव्या वर्षाचं स्वागत कसं करावं. सर्वोच्च ठिकाणी एखाद्या डोंगर कपारीत, गुहेत किंवा मंदिरात किंवा एखाद्या नदीच्या खो:यात मुक्काम करावा, सवंगडय़ांसोबत किस्स्यांची मैफल जमवावी, सरणा:या वर्षाचा हिशेबठिशेब मांडावा, नवा संकल्प सोडावा आणि डोंगरावरची मंतरलेली पहाट, सूर्योदयाच्या साक्षीने नव्या वर्षाचं स्वागत करावं.
पण हे सारं कुठं? सगळ्यांसारखं धबडग्यात न करता, थेट डोंगरमाथा, गडकिल्ले.
एखाद्या गडावर, किल्ल्यावर थर्टीफस्ट साजरा करायचा या नुसत्या कल्पनेने अंगावर शहारे येतात. त्या डोंगरावर हुडहुडून टाकणा:या थंडीचा खराखुरा आनंद घ्यायचा. स्वत:च्या हाताने चुलीवर मस्तपैकी आवडीचा बेत करायचा, टाक्यातलं नैसर्गिक मिनरल वॉटर प्यायचं आणि भल्या सकाळी उठून त्या नव्या वर्षीच्या पहिल्या भास्कराचं दर्शन घ्यायचं.
रानातून, डोंगरकडय़ावरून दिवसभर मस्त पायपीट करून डोंगरमाथा गाठायचा, गुहेत किंवा टाक्याच्या बाजूला किंवा एखाद्या दुर्गशिखराच्या मंदिरात मुक्काम म्हणजे ए वन बेत. रात्री मस्तपैकी शेकोटीभोवती एक एक करून सर्वांनी वर्षभरातल्या चांगल्या नी वाईट कामांची जंत्री मांडायची, तडीस नेण्यासाठी नवे संकल्प सोडायचे, गप्पाटप्पा, जोक्सवोक्स, गाणीबिणी सर्व पोतडीच खोलून टाकायची अन् धमाल थर्टीफस्ट साजरा करायचा.
नव्या वर्षी मग पक्ष्यांच्या किलबिलाटासह भल्या सकाळी लवकर उठून स्लिपिंग बॅगच्या बाहेर पडायचं. आहे की नाही नववर्षाची सर्वोत्तम सुरुवात! लागोलाग शेकाटी पेटवून पाणी गरम करायला ठेवायचं, सगळ्या झोपाळूंना जागं करायचं आणि निघायचं त्याच्या दर्शनाला ! तो उगवताना पाहण्यासारखं सुख नाही.
आहे की नाही नववर्षाची आदर्श सुरुवात? पण हे काम तितकं सोपं नाही.
आणि अशी काही कल्पना डोक्यात असेल आणि प्रत्यक्षात उतरवायची तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. पहिली गोष्ट म्हणजे थर्टीफस्टवाल्या टिपिकल राडेबाज मंडळींचा ससेमिरा नको, म्हणून आडवाटेचा गड निवडायचा. आपले किती अंतर प्रवास करण्याचे नियोजन आहे, यावर सर्व काही अवलंबून असेल. लोकप्रिय ठिकाणी ओव्हरक्राऊडिंगचा धोका कायम राहणार, त्यापेक्षा कमी वहिवाटीची ठिकाणं निवडायची. वेळ थोडा असेल, कामावर लवकर हजर होणं गरजेचं असेल तर तुमच्या जवळपासचं ठिकाणसुद्धा निवडू शकता. तिथं आपल्यासारखीच निसर्ग व इतिहासाचा आदर करणारी दोस्तमंडळी अगोदरच येऊन थांबली असेल तरी काही बिघडत नाही. त्यांचे व आपले विचार जुळवून घ्यायचे, मनाचा हिरमोड होऊ द्यायचा नाही. उलट नवे दोस्त जोडता आले तर जोडायचे. हवं तर आपला वेगळा तळ बनवायचा. पण एकपेक्षा अधिक ग्रुप म्हणजे अडचण असं मानण्याचं कारण नाही. तिथं राडेबाज असतील तरी निसर्गाचा मान राखण्याचं सांगून बघावं. बहुतांशी लोक ताळ्यावर येतात. नाही तर सरळ फोन फिरवून प्रशासनाला कल्पना द्यायची. कारण गडांवर, डोंगरांवर गोंधळ माजवणा:यांना पोलीस, वन विभाग किंवा स्थानिक वन संरक्षण समितीच्या कारवाईला सामोरे जावे लागेल यात शंका नाही. त्याकरिता गडावर जाण्यापूर्वीच त्यांचे नंबर मात्र मिळवून ठेवावेत.
आपली आनंदयात्र, तिचा शेवटही आनंदानंच करायचा. यासाठी डोंगरावर वावरण्याचे जे नियम ट्रेकर मंडळी पाळतात त्याचे कसोशीनं पालन करायचं. सर्वात पहिली अट, ही काही कोणती स्पर्धा नाही. तेव्हा पुढे जाण्याची, डोंगर चढण्याची स्पर्धा निर्माण होऊ द्यायची नाही. काही वेळा सहज सोप्या वाटणा:या ठिकाणीसुद्धा तोल जाण्याचे, घसरून पडण्याचे प्रकार घडले आहेत. अशावेळी मदत आणि बचावकार्य कठीण होऊन बसतं. म्हणून सावध राहायचं.
डोंगराच्या पायथ्याच्या ठिकाणी वाडी-वस्तीतून एखादा मार्गदर्शक घेणं हे अत्यंत महत्त्वाचं. त्याकरिता योग्य ती रक्कम ठरवून घेणंही जरुरीचं. त्यामुळे कुठे अंधारात ये-जा करावी लागली तरी वाट चुकण्याचा संभव राहत नाही. डोंगरावरच्या वास्तू, महत्त्वाची ठिकाणो, पाणवठे यांची सहजपणो माहिती मिळते. शिवाय या मंडळींशी गप्पा मारून त्यांच्या परिसराची छान माहिती पण मिळू शकते. सोबत गरम कपडे, शिधासामग्री, बॅटरी, पाण्याच्या बाटल्या, वही-पेन जरूर ठेवावं. ही ठिकाणं ना मद्यपान करण्याची, ना मांसाहार शिजविण्याची. असे काही प्रकार करण्याची उत्कट इच्छा असेल तर तुमच्या गावातच थांबलात तर बरे! त्यामुळे हे सारं कटाक्षानं टाळायचं.
एवढं केलंत तरी एक नवीन सूर्योदय तुम्हाला नक्की भेटेल!
काय करावं, काय करू नये.
निसर्गाच्या सान्निध्यात थर्टीफस्ट साजरा करण्यासारखी भन्नाट कल्पना नाही. त्यासाठी खर्च थोडा येतो. वस्तूही फार थोडय़ा लागतात. पण काही नियम लक्षात ठेवायचे.
1) मुक्कामाचा अवधी बघून वापरण्याजोगे कपडे. कपडे निवडताना संपूर्ण शरीर झाकणारे पूर्ण बाह्यांचे शर्ट किंवा टॉप व पूर्ण बॉटमची पॅण्ट. हवं तर एखादा जादा ड्रेस नेऊ शकता व नाईटसाठी सुटसुटीत ड्रेसही चालू शकतो. हाफ, थ्री फोर्थ बिलकुल नको. हिवाळा असल्याने गरम कपडे हवे.
2) ग्रुपच्या आकारमानानुसार भांडी घ्यावी व पुरेसा शिधा सोबत न्यावा. सामग्री प्रवासाच्या सुरुवातीलाच प्रत्येकाकडे समसमानपणो द्यावी. पोर्टेबल स्टोव्ह असणं आवश्यक व उपयुक्त. त्यामुळे अकारण लाकूडफाटा जाळण्याची गरज नाही. पोर्टेबल नसेल तर नेहमीचा स्टोव्हसुद्धा चालेल. स्टोव्हकरिता रॉकेल मात्र स्वतंत्र बाटलीत भरून घ्यावे.
3. कॅमेरा व नोंदवही, दुर्बीण, चघळण्यासाठी सुकामेवा, आवळा कॅण्डी, इलेक्ट्रॉल पाऊडर व गरज भासल्यास घरी तयार केलेला चिवडा किंवा भाजलेले मुरमुरे, दाणो सोबत न्यावे. पाकीटबंद जंक फूड नको.
4. मद्य, मांसाबरोबरच आवाज करणा:या कुठल्याही वस्तू नको. त्यात वाद्य व फटाकेही आलेच. या गोष्टी कुठल्याही डोंगरावर नेण्यास बंदी आहे. त्यामुळे कारवाई होऊ शकते.
5. डोंगरावरचे पाणीसाठे मर्यादित आहेत. त्याचप्रमाणो डोंगराच्या पायथ्याच्या वाडी-वस्तीतही पाण्याची फार चांगली स्थिती नाही. त्यामुळे अशा ठिकाणी अंघोळ करणं टाळावं.
6. आपल्या हातून डोंगराच्या देवतेचे पूजन घडणार असेल ती चांगली गोष्ट. त्याकरिता नारळ, धूपबत्ती व थोडा प्रसाद सोबत न्यायला हरकत नाही.
7. एक वेगळी कल्पना : असा भन्नाट कार्यक्र म फक्त मित्रंसोबतच होऊ शकतो असे नाही, कुटुंबाचाही विचार करा. यावेळेला कुटुंबालाच अशा एक्झॉटिक ठिकाणी नेता आले तर? कुटुंबातल्या सगळ्यांना मानवेल अशी निसर्गाची अनेक ठिकाणो आहेत. जाणकारांशी चर्चा करून असं एखादं सर्वस्वी वेगळं ठिकाण शोधणं काही अवघड नाही. नाहीच काही तर एखाद्या शेतावर किंवा एखाद्या कृषी पर्यटनाच्या ठिकाणी मुक्कामी नेऊ शकता. फक्त थोडी अधिक तयारी करावी लागू शकते, इतकेच. पण हा विचार जरूर करून बघा!