Aराष्ट्रीय आणि सामाजिक एकता हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणोशोत्सव सुरू केला, पण आता काय चित्र दिसतंय?
गणोशोत्सवाचं सारं रूपच बदलून गेलं आहे.
कला आणि विद्येचा अधिपती असलेला गणपतीबाप्पा, त्याचं रूप आपण कसं साकारतोय?
प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी), थर्मोकोल, घातक व भडक रंग, त्यात असलेलं शिसं, कोरोमिअम, जस्त हे सारं पाण्यातल्या माशांच्या जिवावर उठतं. हजारोंनी मासे त्यामुळे मरतात.
मोठमोठय़ा शहरातले मोठमोठे गणपती जेव्हा विसर्जित होत मोठय़ा जलाशयात जातात तेव्हा त्या पाण्यातली जलसृष्टीच धोक्यात येते.
तसं पाहता आता काही लोक जागरूक होत आहेत. ते छोटय़ा शाडू मातीच्या मूर्ती आणू लागलेत. खरंतर शाडू मातीचे गणपती बनवणं, ते वाळवणं, त्यांची वाहतूक हे महाकठीण काम. काही तुटफूट झाली तर ते पीओपीच्या गणपतींप्रमाणो लगेच दुरुस्तही करता येत नाहीत. त्यामुळे शाडू मातीचे गणपती महागही असतात.
मात्र तरी होतं काय, शाडू मातीच्या गणपतींवरही घातक रंगांचे स्प्रे मारलेले असतातच. त्यामुळे पर्यावरणपूरक गोष्टींना हरताळ फासला जातोच.
त्यामुळे आमची संस्था गेली काही वर्षे शाडूचे, कागदाच्या लगद्याचे गणपती करण्याचे प्रयत्न करते आहे. त्यावर रंग म्हणूनही नैसर्गिक गोष्टी म्हणजेच हळद, कुंकू, मुलतानी माती, गेरू असं आम्ही लावतो. त्यामुळे पाण्यात गणपती विसर्जित केले तरी त्यापासून अपाय होत नाही.
लोकांनाही हे पटवून देत असताना आम्ही सांगतोच की, दोन फूट किंवा चोवीस इंच गणपती मूर्ती जर तुम्ही घेणार असाल तर ती इको फ्रेण्डली नाही. तिचं विसर्जन केलं की त्याचा जलजीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यांचा गाळ पाण्यात बसतो. त्यामुळे पाण्यातलं ऑक्सिजनचं प्रमाण घटतं.
मात्र वाईट याचंच वाटतं की, हे सारं माहिती असूनही काही शिकलेल्या, शहरी लोकांना वाटतंच की, आपल्या बाप्पाची मूर्ती दरवर्षी वाढायलाच हवी. मोठीच मूर्ती आणायला हवी. तसं त्यांना बाजारपेठ पढवतेही. पण ते खरं नाही. कारण आपण लहान मूर्ती आणली तर त्याचा थेट परिणाम बाजारपेठेवर होतोच. एक कुटुंब किंवा सोसायटीने जर त्यांच्या सहा फूट उंचीच्या मूर्तीची उंची 8 ते 12 इंचांनी कमी करणं हीसुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे.
लहान मूर्ती आणा या आमच्या आव्हानाला अनेक लोकांनी प्रतिसाद देत इको फ्रेण्डली गणोशोत्सवाच्या दिशेनं एकेक पाऊल पुढे टाकायला सुरुवातही केली आहे.
पण गणपतीची मूर्ती छोटी झाली तरी सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो डेकोरेशनचा!
तीच थर्मोकोलची मखरं नी मंदिरं सगळीकडे दिसतात. खरंतर प्लॅस्टिक, थर्मोकोल, धातू, काचा, फायबर, स्टायरोफोम हे सारं डेकोरेशनचं साहित्य घातक आहे हे सगळ्यांनाच कळतं.
जैवविघटन न होऊ शकणारी कुठलीही गोष्ट वापरू नये हे तर शाळेतल्या मुलांनाही पाठ झालेलं आहे. तरीही लोक या वस्तू वापरून डेकोरेशन करतात हे वाईट आहे.
म्हणून मग आम्ही लहान मुलांसाठी वर्कशॉप घेतो. घरातल्याच वस्तू, रोपं, कुंडय़ा, बॉल्स, कपडे, वापरलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, सॉफ्ट ड्रिंक्सचे कंटेनर वापरून कसे डेकोरेशन करता येईल याच्या कार्यशाळाही घेतो. अगदी मिरची, कोथिंबीर, वांग्याची रोपंही डेकोरेशनचा भाग बनू शकतात.
मात्र अट एकच, हे सारं डेकोरेशन बाप्पाबरोबर विसर्जित करत पाण्यात सोडायचं नाही. ते सारं रिसायकल करून वापरायचं. जमल्यास निर्माल्याचं खतही बनवायचं.
यंदा मात्र आम्ही एक नवीनच युक्ती केली. खरंतर मोठय़ा जलाशयात मूर्ती विसर्जित न करणंच योग्य.
मात्र तरीही जे लोक मूर्ती विसर्जनाची परंपरा मानतात, त्यांच्यासाठी एक युक्ती आम्ही केली. ओ अॅण्ड एम नावाच्या एका जाहिरात कंपनीसोबत केलेल्या टायपनुसार हे काम करण्यात आलं. आयडिया त्यांची, ती प्रत्यक्षात आम्ही आणली.
इको फ्रेण्डली गणोशमूर्तीच्या पोटात शाकाहारी अन्न ठेवायचं अशी ती कल्पना. या शाकाहारी पदार्थात पालक, मका, गहू यांचा समावेश होता. त्या कल्पनेचं नाव होतं ‘गॉड सेव्ह द ओशन’. म्हणजे काय तर पाण्यात ही मूर्ती विसर्जित झाली, विरघळली की हे शाकाहारी अन्नही पाण्यात जाईल आणि माशांना जगवेल! पाण्यातली जीवसृष्टी वाचेल.
मात्र अशा गणोशमूर्ती तयार कराव्या लागल्या. कॉलेजात शिकणारी मुलं, बचतगटांच्या महिला यांना आम्ही प्रशिक्षण दिलं. आणि अशा गणोशमूर्ती तयार केल्या.
त्यांच्या पोटात हे शाकाहारी अन्नांचे लाडू ठेवले. त्यातून पाण्यातले मासेच नाही तर जीवजंतूही जगतील आणि त्यांना मदत होईल, बाप्पाचा आशीर्वाद मिळेल अशी ही कल्पना आहे.
आमचा एक वेगळा प्रयत्न आहे, पर्यावरण जगवण्याचा!
- आनंद पेंढारकर संचालक, स्प्राऊन पर्यावरण संस्था
पोटातल्या शाकाहारी लाडवांना सोशल मीडियावर खूप उत्तम प्रतिसाद मिळाला. साडेतीन लाखांहून अधिक लोकांनी ही आयडिया शेअर केली. देशभरातून अनेक लोकांनी फोन करून असे गणपती कुठे मिळतील हे विचारलं. पण आमचं काम यंदा मुंबईपुरतंच मर्यादित होतं.
एक नक्की, चर्चा खूप झाली, पण कुठलीही नवीन गोष्ट स्वीकारतानाचा प्रतिसाद आपल्याकडे स्लोच असतो. पण तरीही पुढच्या वर्षी अजून चांगलं काम करता येईल, अशी आशा आहे.