पाऊस म्हटलं की, मला २६ जुलै आठवतोच. २६ जुलैपूर्वी मलाही पाऊस गोड, छान व प्रेमळ वाटत होता, पण त्यानंतर त्याची आठवणही भयभीत करणारी वाटते. मी कुर्ला (प.) भागातील तक्यावार्डमध्ये लोकमान्य सेवा मंडळात राहत होतो. आमच्या जवळूनच मिठी नदी (खाडी म्हटलं तरी चालेल) वाहते. २६ जुलैपासूनच सर्वांना ही मिठी नदी माहीत झाली.
२५ जुलैला पावसाला सुरुवात झाली, तो नेहमीसारखा पडत होता. हळूहळू पावसाचा जोर वाढतच होता. अन्सायंकाळी बघता बघता पाणी मिठी नदी भरून वाहू लागलं. रात्री पाणी आमच्या घराघरात शिरण्यास सुरुवात झाली. आम्हा सगळ्य़ांची धावपळ सुरू झाली. आम्ही मुलं एकमेकांच्या घरात जाऊन सामान हलवू लागलो, पण पाणी एवढय़ा जलद गतीनं वाढत होतं की, आम्हाला मदत करणंही अशक्य होऊ लागलं. पाण्याची पातळी वाढतच होती. अन् नेमकी त्यात वीज गेली. सगळीकडे अंधारच अंधार ! आमची चाळ असल्यानं सगळीकडे दाटीवाटी होती. मोकळं पटांगण असं नव्हतंच. शाळा, कॉलेज, नोकरीवरून येणारी मुलं-मुली, नोकरदार माणसं अक्षरश: पोहत पोहत येत होती. आम्ही घराबाहेर थांबून प्रत्येकाला हात देण्याचं काम करीत होतो. घरातील सामान व माणसं सुरक्षितस्थळी हलवण्याचं काम करीत होतो. सगळीकडे अंधार, चोहोबाजूला पाणी असं चित्र तयार होत होतं. पाणी वाढतच होतं. पाऊसही थांबायला तयार नव्हता. आम्ही दुपारपासून भिजत होतो. आमच्या पायाखाली कधी कधी उंदीर, घूस घुटमळून जात होते, तर कधी चावा घेत निघून जात होते.
सर्वत्र घाणीघाण होती. शौचालयं, गटारी, कचराकुंड्या हे सर्वत्र पाण्यामुळे एकच झालेलं होतं. त्यामुळे सगळीकडे दुर्गंधी. रात्री तर पाणी आणखी जोर धरू लागलं. घरातील पोटमाळ्य़ाला पाणी टेकत होतं. माणसं भीतीनं पोटमाळ्य़ावर बसले होते. आम्ही मिनिटागणिक पाण्याची पातळी बघून देवाचा धावा करीत होतो. पोटमाळ्याला लागलेलं पाणी छताला लागायला लागलं. मध्यरात्र उलटून गेली, तरीही पाणी काही कमी होईना. नदीकडील माणसं स्वत:ची बायका पोरं घेऊन घराच्या छपरावर बसलेले दिसत होती. अन् पाणी छपराला टेकेल अशी स्थिती. आमच्या समोरून फ्रीज, टीव्ही, मोटारसायकल, घरातील कपाट इ. वस्तू अक्षरश: वाहून जात होत्या.
वस्तूच कशाला एक मृतदेह वाहत आला. आम्ही तो तसाच पुढे जाऊ दिला, आम्ही तरी दुसरं काय करणार? आपला जीव वाचला हेच फार होतं. पहाटे ४ वाजल्यापासून पाणी ओसरू लागलं. जो तो आपापली माणसं शोधू लागला. एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं होतं. मला तर आजही पाऊस पडायला लागला की भीतीच वाटते.
- हनुमंत रामचंद्र कोडलकर
मु. कोडलकरवाडी,
ता. माण,
जि. सातारा