हिमगौरी आणि सात बुटक्यांची’ गोष्ट आठवतेय का तुम्हाला. हिमगौरीच्या सावत्र आईला तिच्या गोरं असण्याचा कसा त्रास होत होता त्यामुळे ती हिमगौरीबरोबर कशी दुष्टपणाने वागली.
किंवा दुसरं उदाहरण रामायणातलं. कैकयी राणीचं. दशरथ राजा रामालाच अयोध्येचा राजा बनवतील मग माझ्या तर माझ्या भरताचं काय असा विचार करुन मत्सरानं पेटून उठलेल्या कैकयीनं मग रामाला थेट वनवासात पाठवून दिलं.
हे सारं काय आहे तर?
असूया किंवा मत्सर. या दोन भावना एकाच नाण्याच्या दोन बाजू, माणसाचं मन कलुषित करणार्या सूडबुद्धीनं वागायला प्रवृत्त करणार्या अतिशय नकारात्मक अशा या भावना. आपल्याला जेलस वाटतं, कुणाविषयी तरी असूया किंवा मत्सर वाटतो तेव्हा ते मान्य करणंही फारसं कुणाला आवडत नाही.
बर्याच कथांमध्ये, चित्रपटांमध्ये आणि अगदी जाहिरातीतसुद्धा या भावना बर्याचदा वापरल्या जातात. ‘भला उसकी कमिज मेरी कमिजसे सफेद कैसे..?’ असं जेव्हा आपल्या मनात येतं, तेव्हा ते दुसरं काय असतं?
आपली मैत्रीण किती किती छान गाणं म्हणते, तसं मला का नाही म्हणता येत?
माझा बॉयफ्रेण्ड त्याच्याबरोबर नाटकात काम करणार्या मुलीशी एवढा वेळ काय बोलत बसतो?
त्या अमक्याचा मोबाइल कसला भारीये, मलापण तसाच मोबाइल हवा..
जेव्हा दुसर्या व्यक्तीकडे असलेल्या वस्तूसारखीच वस्तू आपल्याला हवी असते (आणि ती आपल्याजवळ नसण्याचा त्रास होतो) किंवा दुसर्याचा एखादा विशेष गुण आपल्यात नसण्याची जाणीव, होते (चित्रकला, रंग, उंची इत्यादी) त्याच्याकडे आहे पण माझ्याकडे नाही याचाच जास्त त्रास होतो किंवा दुसर्याला मिळणारं यश (मी पण अभ्यास केला होता पण तिचा पहिला नंबर आला) अशा वेळांना वाटणारी भावना असूयेची असते.
दुसर्याकडे आहे पण आपल्याकडे नाही, ही खंत वाटणं ही झाली असूया.
पण जेव्हा माझ्याकडे असलेल्या एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीला, माझ्या एखाद्या खास नात्याला तिसर्या व्यक्तीकडून काही धोका आहे, अशी शक्यता आहे असं वाटतं त्यावेळी मनात निर्माण होणारी भावना म्हणजे मत्सर. जेलसी. मत्सराच्या भावनेत नकारात्मक विचारांसोबत एकप्रकारची असुरक्षितता, राग, भीती, चिंता, असमाधान, असहायता, स्वत:विषयीची कमतरतेची भावना अशा विविध भावनांचं मिश्रण तयार होतं. प्रेमात पडलो तर आपण मान्य करतो पण आपल्याला जेलस वाटतं असं कुणी चटकन मान्य करत नाही. पण कमी-अधिक प्रमाणात या भावना प्रत्येकाला जाणवत असतातच. पण मला मत्सर वाटतोय असं मान्य करायला मात्र बर्याच जणांना लाज वाटते.
पण ‘योग्य प्रमाणात’ ही भावना जाणवली तर ती नक्कीच मदत करणारी ठरते. आपण योग्य दृष्टिकोनातून जर या गोष्टीकडे पाहिलं तर त्या निमित्तानं स्वत:मध्ये काही बदल करायला हवेत याची जाणीव होऊ शकते. उदा. ती माझ्यापेक्षा छान गाणं म्हणते म्हणजे मला अजून शिकण्यासारखं बरंच आहे. स्वत:च्या कमतरतांवर पांघरूण घालण्यापेक्षा त्या कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न यानिमित्तानं करता येऊ शकतो.
मत्सराची भावना जेव्हा जाणवत असते तेव्हा त्याचा लगेच नात्यावर परिणाम होऊ देण्यापेक्षा आपल्या मनात लपलेली असुरक्षिततेची भावना का आणि कोणत्या कारणानं आहे हे समजून घेतलं तर त्याचा कदाचित जास्त उपयोग होऊ शकेल. या भावना जाणवल्या आणि त्या योग्य पद्धतीनं हाताळल्या तर स्वत:कडे पाहण्याचा, स्वत:च्या कमतरतांकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन निर्माण होऊ शकतो.
पण या भावना खूप तीव्रतेनं जाणवल्या तर मात्र त्या खूपच त्रासदायक ठरू शकतात. क्वचित प्रसंगी या भावनेमुळे माणसांमधली आक्रमकताही वाढताना दिसते.
त्यामुळे ही भावना जाणवत असेल तर तिला नाकारू नका अथवा अपराधी भावही मनात बाळगू नका. ही भावना जाणवण्यापाठीमागे असणारे विचार जाणून घ्या.
स्वत:च्या कमतरतांची, असुरक्षिततेची कारणं यानिमित्तानं शोधून काढा.
जेलस वाटतंच, ते वाटल्यावर तुम्ही ती तुम्ही भावना कशी हाताळता हे महत्त्वाचं.
- डॉ. संज्योत देशपांडे