काही माणसांचं असं होतं की ते करत काही नाही, पण त्यांच्या मनात अनेकदा त्यांना विचित्र वाटणारे, चुकीचे वाटणारे किंवा (त्यांच्या मते) चुकीचं वागावं असं वाटणारे विचार येतात. कुणाकुणाला वाटतं, की सारे नियम, सारी मूल्यं तोडून टाकावीत, भिरकावून टाकावं सारं असं त्यांच्या मनात येतं.
पण थेट तसं काही न करताही, आपल्या मनात असा नुस्ता विचारही कसा आला यातूनच त्यांना अपराधी वाटत रहातं. माझ्या मनात असे ‘चुकीचे’ विचार येऊच कसे शकतात.
आणि तसे ते येतात म्हणजे मी वाईट आहे हा विचार त्यांची पाठ सोडत नाही आणि याविषयीच त्यांना गिल्टी वाटतं.
अशी माणसं मनानं अतिशय पापभिरू आणि संवेदनशील असतात. सरळमार्गी असतात. काहीबाही करण्याच्या विचारानंही त्यांच्या मनात अपराधी भाव मनात दाटून येतो.
खरंतर अपराधीपणाची-पश्चात्तापाची भावना स्वत:विषयी खूप काही शिकविणारी, स्वत:कडे वेगळ्या दृष्टिकोनातून पहायला शिकविणारी भावना असते. तिला नाकारू नये, तिचं सर्मथनही करू नये. उलट त्या भावनेला स्वीकारलं आणि योग्य पद्धतीनं हाताळलं तर आपल्याला आपलीच वेगळी ओळख करेल. आपल्या जगण्यालाही वेगळी दिशा मिळेल.
पण मला असं वाटलंच कसं असा विचार करत बसलं, स्वत:लाच छळत बसलं तर मनावर उदासीचं मळभ येण्यापलीकडे दुसरं काहीच होणार नाही.
- डॉ. संज्योत देशपांडे
प्रदीप अभ्यासात तसा बरा मुलगा. बर्यापैकी मेहनत करणारा. पण परीक्षेच्या आधी त्याच्या लक्षात आलं की,
यावर्षी त्याचा म्हणावा तसा अभ्यास झाला नाही. आता इतक्या ऐनवेळेस अभ्यास पुरा करायला वेळ नाही. आणि पेपर नीट लिहिला नाही तर मार्क कमी पडणार. कदाचित आपण नापास पण होणार.
प्रदीप मनातून अस्वस्थ झाला. वर्षभर आपण अभ्यास नीट केला नाही म्हणून स्वत:ला दोष देऊ लागला.
आणि अचानक त्याच्या मनात विचार आला की कॉपी करूया का?
पहिल्यांदा त्याला त्या विचाराची लाज वाटली पण नंतर तो हळूहळू त्या विचाराचं सर्मथन करू लागला. काय हरकत आहे? आपण आजतागायत एकदाही कॉपी केली नाही. कितीतरी मुलं करतात मग आपण ‘एखाद्या वेळेस’ केली तर कुठे बिघडणार आहे? वाटल्यास मी देवाची आधी क्षमा मागेन, चुकलं म्हणेन आणि हो इतका कमी अभ्यास मी परत कधीच करणार नाही. अशी वेळच येऊ देणार नाही, पण एवढी चूक सुधारण्याची देवा संधी देच.
दुसर्या दिवशी प्रदीप उठला; पण तेव्हा त्याच्या मनात प्रचंड प्रमाणात अपराधीपणाची भावना दाटून आली होती. त्यानं कॉपी तर केली नाहीच, पण ‘‘असं काहीतरी करण्याचा विचार माझ्या मनात येऊच कसा शकतो..’’ या विचारानंच त्याला कसंसं झालं.
स्वत:ची किळस वाटली, मला असं वाटूच कसं शकत, असं वाटून त्याला भयंकर अपराधी वाटलं.
असं तुमचंही झालं तर काय कराल?
१) विचार आणि कृती यात फरक करायला शिका. आपण नुस्ता विचार केला, कृती केलेली नाही हे विसरू नकाच.
२) अशा पद्धतीचे विचार मनात कधीतरी येऊ शकतात, पण तशी कृती करायची की नाही यावर आपलं नियंत्रण असतंच ना.
३) असं आपल्याला वाटलंच कसं असं म्हणून तो विचारच नाकारण्यापेक्षा, आपल्याला असं वाटलं हे मान्य करून टाका. मनावरचा ताण कमी होईल.
इशा आणि राणी दोघीही जवळच्या सख्ख्या मैत्रिणी. अगदी लहानपणापासूनच्या जिवाभावाच्या!
इशाची आई आजारी पडली- तिला कॅन्सर झाला आणि खूप दिवसांच्या उपचारानंतर ती गेली. या सर्व काळात राणीनं इशाला खूप मदत केली. हॉस्पिटलमध्ये आई असताना तिथे जाणं, तिला मदत करणं, तिला तिच्या बुडलेल्या अभ्यासाच्या नोट्स देणं, कॉलेजमध्ये तिची सबमिशन पूर्ण करायला मदत करणं. जेवढं शक्य असेल तेवढं राणी करत राहिली. मनापासून मदत करण्याचा राणीचा स्वभावच होता. इशाची आई गेल्यावरही ती तिच्या घरी जाऊन इशाला मदत करत असे, कंपनी देत असे. पण दरम्यानच्या काळात परीक्षाही जवळ आली. वाढलेला अभ्यास - इतर कामं यात इशाला आधी देत होतो तेवढा वेळ द्यायला अडचणी यायला लागल्या. यातून धावपळ करून ती तरीही ते कसंबसं जमवत असे. पण याचा बराच शारीरिक व मानसिक थकवा तिला येऊ लागला.
पण ‘‘आपण अजून तिला मदत करायला हवी होती.. आपल्याकडून काही कमी तर राहिली नाही ना..?’’ हा विचार तिच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करू लागला. राणी या विचारानं खूपच अस्वस्थ झाली.
असं तुमचंही झालं तर काय कराल?
१) कधी कधी खूप मनापासून मदत केली तरी आपण अजून करायला हवी होती. आपण कमी पडलो या विचारानं अनेक जणांना अपराधी वाटतं. खरंतर शक्य असेल तेवढी मदत अनेक प्रकारचा ताण सहन करून केलेली असते. त्यात हे असं गिल्टी वाटलं की मानसिक ताण अजून वाढतो. आपण शक्य तेवढी मदत केली आहे यावर विश्वास ठेवा,
२) इतरांना मदत करताना आपण स्वत:चीही काळजी घेण्याची गरज असते याचंही भान ठेवा.
३) कितीही केलं तरी कमी पडलो म्हणून स्वत:ला दोष देऊ नका.
8 संजय आणि विजय असेच जवळचे मित्र. एकदा त्यांचा पाच-सहा मित्रांचा ग्रुप ट्रिपला जायला निघाला. सगळेच जण अगदी मजेत गाणी म्हणत मजा करत चालले होते. संजय-विजय गाडीत शेजारी शेजारी बसले होते. आणि त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यात विजय जागच्या जागी गेला. बाकीच्या मित्रांनाही काही दुखापती झाल्या. संजयलाही काही किरकोळ जखमा झाल्या. या सर्व घटनेचा मानसिक धक्का संजयला बसलाच, पण आपला मित्र आपल्याला सोडून गेला आणि आपण असे मागे राहिलो ही भावना त्याच्या मनाशी रुतून बसली.
जिवाभावाच्या माणसाचा मृत्यू झाला तर अनेकांना वाटतं की, ‘आपण का नाही गेलो त्याच्यापेक्षा?’
तो माणूस गेला आणि आपण जिवंत आहोत याविषयीच काही माणसांना अपराधी वाटतं. आणि तो गिल्ट अनेकांचं जगणंच कोमेजून टाकतो.
असं तुमचंही झालं
तर काय कराल?
१) मृत्यू अटळ आहे, हे मान्यच करायला हवं.
२) तुम्ही मागे राहिलात यात तुमचा काही दोष नाही, हे मान्य केलं तरच जगता येऊ शकतं.