झाला फुटबॉल वर्ल्डकप सुरू. भारतात काय त्याचं? आपल्याकडे कुठं आहे, फुटबॉलला काही स्कोप?
- असा निराशावादी सूर लावला तर खरंच अवतीभोवती काहीच दिसू नये.
पण शोधलंच की, भारतीय फुटबॉलमध्ये नव्यानं काय घडतंय? तर बरंच काहीतरी ‘घडताना’ दिसेल. त्याचंच एक उदाहरण म्हणजे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनतर्फे दोहातल्या अँस्पायर अकॅडमीतल्या कॅम्पसाठी निवडले गेलेले पाच खेळाडू. राकेश ओरम, धीरज सिंग, मिलन बासुमॅटरी, बिद्यानंद सिंग आणि गुरसिमरन सिंग.
या पाचही मुलांनी दोहातल्या अकॅडमीत आपल्या कौशल्यानं युरोपियन प्रशिक्षकांना चकित केले. विशेष म्हणजे त्यांनी आपल्यापेक्षा वयानं मोठय़ा असलेल्या मुलांच्या संघाला तिथं मातही दिली.
ऑल इंडिया फेडरेशनतर्फे या मुलांना नवी मुंबईतल्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे उत्तम प्रशिक्षण मिळत आहे. फुटबॉल हा खेळ भारतातही व्यावसायिक स्तरावर खेळला जावा म्हणून फेडरेशन प्रयत्न करत आहे.
राष्ट्रीय स्तरावर हे प्रयत्न सुरू असले तरी सर्व देशांत काही फुटबॉलचं वारं नाही, वेड तर नाहीच नाही. मात्र ज्या राज्यातलं तारुण्य फुटबॉलवेडं आहे, त्या राज्यात मात्र स्पोर्टस् असोसिएशन ऑफ इंडियातर्फे फुटबॉल खेळाडूंच्या प्रशिक्षणाची सोय केली जात आहे. त्यातलंच एक राज्य म्हणजे मणिपूर.
ऑल मणिपूर फुटबॉल असोसिएशनचे रणजित रॉय जे सांगतात, ते या राज्यातल्या फुटबॉलवेडाचं वेगळं रूप आहे. रॉय म्हणतात, ‘आमच्याकडे कित्येक दिवस बंद, वीज नसते. मुलांना स्वत:चा जीव रमवायचा तर सोबत फुटबॉलशिवाय दुसरा काही पर्याय नाही आणि त्यातून काही मुलं इतका सुंदर फुटबॉल खेळायला लागतात की, अनेकदा वाटतं की या मुलांना जास्त चांगलं प्रशिक्षण मिळायला हवं.’
त्या प्रशिक्षणाचीच सोय ही असोसिएशन करते. त्यातून अनेक मुलं लहान वयातच राष्ट्रीय स्तरापर्यंत लवकर धडक मारतात, खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवतात. आपल्या खेळाडूंना असा नावलौकिक मिळायला हवा म्हणून राबणारी आणि फुटबॉल शिकवणारी इम्फाळमधली आणखी एक संस्था आहे, थोकचाम बिरचंद्र सिंग फुटबॉल अकॅडमी. या अकॅडमीचे संचालक तर स्वत: फुटबॉलवेडे. त्यांचं स्वप्न होतं, मणिपुरी खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर फुटबॉलला ओळख मिळवून द्यावी. या संस्थेचे संचालक जुरांग सांगतात, ‘४-४ वर्षे मुलं आमच्या अकॅडमीत राहतात. १३व्या वर्षी मुलगा प्रशिक्षणासाठी येतो, म्हणजे काय तर आम्ही त्यांना निवडून आणतो. मग त्याचं खाणं-पिणं-राहणं सगळा खर्च संस्थेचा. या मुलांनी फक्त फुटबॉल कौशल्य शिकावं एवढीच आमची इच्छा आहे.’
त्यातून पदरमोड करून, निधी जमवून, देणग्या मिळवून ही अकॅडमी काम करते आहे. आणि आकार घेत आहेत, काही उत्तम फुटबॉल खेळाडू.
या दूरच्या राज्यातल्या तरुण मुलांना फुटबॉल एक नवीन ओळख मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहे, हे नक्की.