एडन हॅजार्ड.
वयाच्या चौथ्या वर्षी त्यानं पहिल्यांदा फुटबॉलला पाय लावला.
आणि तिथून सुरू झाला प्रोजेक्ट एडनचा प्रवास.
मध्यमवर्गीय कुटुंबातला हा मुलगा. फार लाड नाही पण आपल्याला जे मिळालं नाही, ते मुलांना मिळायला हवं या भावनेनं झटणार्या आईवडिलांनी मुलांना सगळं दिलं. एडनला फुटबॉल हवा होता, तो मिळाला.
क्लबकडून तो फुटबॉल खेळायला लागला, तेव्हाचे त्याचे प्रशिक्षक सांगतात, ‘मला काही शिकवावंच लागलं नाही, त्याला सगळंच येत होतं. फक्त हा मुलगा चांगलाच मुडी होता. मूड गेला की संपलंच सगळं.’
बाकी आर्थिक सामाजिक समस्या काही नव्हत्या, पण स्वत:च्या या मूडस्वर एडनला काम करावं लागलं. म्हणजे काय तर, त्याला स्वत:ला एका शिस्तीत रुळायला भाग पाडायला लागलं.
एडन हॅजार्ड सांगतो, ‘मी मैदानात उतरलो त्या दिवसापासून मला माहिती होतं की, मला फुटबॉल येतो. माझ्या वयाच्या मुलांपेक्षा तर मी जास्त चांगला खेळतो. सहज खेळतो. अनेक जण म्हणायचे माझ्या पायात जादू आहे. ते मला खरंच वाटायला लागलं होतं.’
पण एकदा माझ्या वडिलांनी मला नीट समजावून सांगितलं, ‘ते म्हणाले, तुला थोडेच दिवस खेळायचे असेल तर तुझे सगळे मूड नीट पॅम्पर कर. मूड असेल तर खेळ, नसेल तर नाही. निदान तुला खेळण्याचा तात्पुरता आनंद तरी मिळेल. पण तुला फुटबॉल हेच तुझं आयुष्य बनवायचं असेल तर मात्र तुझे मूड कायमचे गुंडाळून ठेव. आणि यापैकी काहीच करायचं नसेल तर मात्र फुटबॉल कायमचा सोडून दे.’
एडन म्हणतो, तो दिवस आणि आजचा दिवस, मी फक्त फुटबॉल जगतोय. कुणी मला विचारलंच तर एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतोय, ‘ज्याच्यावर आपलं प्रेम आहे, त्याला गृहीत धरू नका, तुमचे मूडस् हे तुम्ही तुमच्या कामाला कसं गृहीत धरता याचं उदाहरण आहे.’
आजच्या घडीला टॉप फुटबॉलर्समध्ये एडनचं नाव जास्त आदरानं घेतलं जातं ते ह्याचमुळे. तो फुटबॉलकडे खेळ किंवा पैसा कमावून देणारं मशिन म्हणून पाहत नाही तर जगणं म्हणून पाहतो.आणि जगण्यात खेळाचे सगळे नियम पाळतो.