- डॉ. संज्योत देशपांडे
उशीर होणं तसं काही नवीन नसतंच. कुठंही-कधीही पोहचायला कायम उशीरच होतो. वेळ चुकली की आपण नेहमी कारणं देतो. दोष देतो. ‘‘ही भेटीची वेळच ज्यानं कुणी ठरवली ती कशी चुकीची आहे, रस्त्यात ट्राफिक कसलं वाईट आहे.’’ अशी वाट्टेल ती कारणं सांगितली जातात, स्वत:लाही-इतरांनाही.
पण आपण वेळेवर निघालो नाही, म्हणून उशीर झाला ही साधी सोपी गोष्ट आपण का मान्य करत नाही?
ती चूक मान्य केली, पश्चात्तापाची भावना योग्य प्रमाणात झाली तर निदान त्या गिल्टपोटी तरी पुढच्या वेळी चूक सुधारण्याची काही शक्यता निर्माण होते. पण आपण त्या भावनेलाच नाकारलं तर त्यातून मानसिक आरोग्याचे वेगळेच प्रश्न निर्माण होतात.
याला म्हणतात अपराधीपणाची भावना. ती योग्य प्रमाणात स्वीकारली तर तिचा फायदाच होतो, पण अती अपराधी वाटू लागलं तरी खूप गंभीर प्रश्न निर्माण होतात. आपल्या चुकांसाठी सतत इतरांना दोष देत राहण्याची सवय लागली तरी प्रश्न बिकट होतात.
प्रत्येकच माणसाच्या मनात एक सदसद्विवेकबुद्धी असते. एक आतला आवाज असतो. तो आतला आवाज आपण कसं वागावं-कसं नाही याची दिशा देत राहतो. लहानपणापासूनच आपण अनुभवातून - संस्कारातून जगण्याचे-वागण्याचे लिखित अलिखित नियम, जगण्याची मूल्ये शिकत जात असतो. आपण चुकीचं वागतो तेव्हा आपलं मन, आपला तो आतला आवाज आपाल्याला सांगतंच असतो की, ‘तू चूक करतोय, चुकीचं वागतोय.’
एका अर्थी ही भावना मदतही करणारी असते. कारण ही भावना न नाकारता आपण ती अनुभवली तर त्यातून आपण खरंतर खूप काही शिकत जात असतो. स्वत:त सुधारणा करण्याची संधीच स्वत:ला देत असतो.
म्हणजे आपल्या बोलण्यानं, वक्तव्यानं जर कुणाला दुखावलं तर आपलं आपल्यालाच कळतं की, माझी बोलण्याची, वागण्याची पद्धत बदलायला हवी. आपलं वागणं चुकतंय याची ही खंतच आपल्याला स्वत:च्या ‘चुकीच्या’ वर्तनाची जाणीव करून देते. त्यातूनच आपण स्वत:कडे वेगळ्या दृष्टीनं पाहायला शिकू शकतो.
दुसरं म्हणजे ही पश्चात्तापाची भावना आपल्या वर्तनाचा स्वत:वर व इतरांवर होणारा परिणामही आपल्याला जाणवून देते. आपण स्वत:ला एका त्रयस्थ नजरेतून तपासून पाहू शकतो. स्वत:मध्ये ख:या अर्थानं काही बदल घडवून आणू शकतो. ‘वाल्याचा वाल्मीकी’ झाल्याची गोष्ट तर आपण लहानपणापासून ऐकतोय.
हे असं वाचायला, समजून घ्यायला जरी सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्षात असं घडत नाही. अनेक जणांना आपल्या हातून चूक झाली म्हणजे आपल्यातच काहीतरी कमतरता आहे, असं वाटायला लागतं. पुन्हा आपल्या हातून तीच चूक घडेल असं वाटून ताण वाढतो, स्वत:विषयीच साशंकता निर्माण होते. काहींची आपल्यातली ती कमतरता पाहून ते मान्य करण्याची, बदल करण्याचीच तयारी नसते. त्यापेक्षा त्या चुकांवर पांघरूण घालण्याचा सोपा मार्ग त्यांना बरा वाटतो. त्यासाठी ही माणसं विविध मार्ग पत्करतात. सतत कारणं सांगत राहतात.
काही माणसं याच्या अगदी उलट. त्यांना लहानसहान चुकांमुळेही खूप अपराधी वाटतं. आपण काहीतरी गुन्हा केलाय, काही पाप केलंय असं ते स्वत:च्या चुकांकडे पाहतात. त्यातून नैराश्य येतं, सतत पश्चात्ताप वाटत राहिल्यानं स्वत:च्या नजरेत त्यांची किंमतही कमी व्हायला लागते. त्याचाही त्यांच्या वर्तनावर खूप नकारात्मक परिणाम होत राहतो.
काही जणांना ब:याचदा उगाचच - विनाकारण अपराधी वाटत रहातं. घडणा:या गोष्टींना आपणच जबाबदार आहोत असं वाटतं. इतरांचा मूड गेला त्याला मीच कारण आहे, असं त्यांना दिवसातून ब:याचदा काहीही कारणाशिवाय वाटत रहातं. यामुळे अशी माणसं सतत काहीशा ओङयाखाली, दडपणाखाली वावरत राहतात. त्याचा त्यांच्या वागण्यावर-बोलण्यावर-कामावर-नातेसंबंधावर परिणाम होतो. अशी माणसं मग स्वत:ला साध्या साध्या चुका करायचीही परवानगी देत नाहीत.
आणि त्यातूनही त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं.
ते स्वत:चाच जीव खात बसतात आणि त्यातून गोष्टी सुधारत नाहीत तर बिघडतच जातात.