खरेदीला जाणं, हे आजही आपल्यासाठी एक सेलिब्रेशनच असतं.
एकटं दुकटं कुणी खरेदीला जातं तरी का?
मित्रमैत्रिणी, सगळा ग्रुप तरी बरोबर जातो नाहीतर कुणीतरी जिवाभावाची मित्रमैत्रीण तरी सोबत असतेच. पूर्वी चार दुकानं पाहत फिरत खरेदी व्हायची आता अख्खा मॉल दिवसभर पालथा घालत एक दोन कपड्यांची खरेदी होती.मग काहीतरी आरबट चरबट खाणं, पिणं, जमल्यास सिनेमा, गप्पा.
हे एवढं सारी झालं तर शॉपिंगची मज्जा येते.
घरबसल्या एकट्यानं एखादी वेबसाइट उघडायची, काय हवं नको ते शोधायचं आणि क्लिक करून टाकायचं, पैसे ऑनलाइन जमा करून टाकायचे, कार्डाचा नंबर काय तो द्यायचा, घरबसल्या वस्तू येतात, झालं शॉपिंग, यात काय मज्जा?
असं आपल्यापैकी अनेक जणांना वाटू शकतं.
पण वेगानं होणारे बदल पाहता आता इतर गोष्टींसारखाच शॉपिंगही आता एकदम पर्सनल खासगी एक्सपिरीयन्स बनेल की काय, अशी शंका येऊ लागली आहे.
आपली गरज, बजेट आणि आवडनिवड याप्रमाणे हवं ते मिळेल त्या वेळी निवडायचं. पैसे मोजायचे, आली वस्तू ट्राय करून पाहायची. घालून पहायची. जमलं सगळं तर ठीक, नाहीतर परत पाठवायची, एक्स्चेंज करून घ्यायची.
किती सोपं होतंय सारं.
पुन्हा फिलिंग तेच. शंभर
प्रॉडक्ट्स पहायची, त्यातून जे योग्य, किफायतशीर वाटेल ते निवडायचं.
जगभरातलं तारुण्य आज हा मार्ग निवडून शॉपिंग करतंय. भारतातली तरुण मुलं तरी कशी मागे राहतील. इंडियन कन्झ्युमर बिहेव्हिअर असोसिएशनच्या ( ही संस्था ग्राहकांच्या गरजा, खरेदीशक्ती, वर्तन याचा अभ्यास करते.) अभ्यासानुसार भारतीय तरुण ग्राहकाची खरेदीची मानसिकताही झपाट्यानं बदलते आहे. जसजसा मोबाइल आणि इंटरनेटचा वापर वाढेल तसतसे खरेदीची परिमाणं बदलतील. मोठय़ाच नाही तर छोट्या शहरातले ग्राहक जास्त प्रमाणात ऑनलाइन शॉपिंग करतील, असा या संस्थेचा अभ्यास म्हणतो. त्याचं कारण एकच, शहरात तरी बडे मॉल, बडे ब्रॅण्डस सहज उपलब्ध असतात. पण छोट्या शहरात, खेड्यात जे आजवर मिळत नव्हतं, ते आता ऑनलाइन सहज मिळतं. कोणी कुठूनही खरेदी करू शकतं. शहर-ग्रामीण सीमारेषा पुसट व्हायची ही बदलती खरेदी-विक्री पद्धतही उपयोगी पडेल असा जाणकारांचा अभ्यास आहे.
त्यामुळे आपल्या खिशातून जाणारा पैसा आपल्या बदलत्या सामाजिक स्थित्यंतराचा भाग आहे हेही समजून घ्यायला हवं.
- आक्सिजन टीम