डॉ. अमित मालविय
बंगळुरूमध्ये मागच्याच महिन्यात देशातलं पहिलं ‘टेक-डीअँडिक्शन सेंटर’ सुरू झालं.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टल हेल्थ अँण्ड न्युरो सायन्स (निम्हांस) ही देशातल्या सर्वात मोठी मानसिक विकार उपचार संस्था. वेगवेगळी व्यसनं, मानसिक व्याधी यावर या संस्थेत उपचार केले जातात. पण या संस्थेत आपल्या मुलांना मारुनमुटकून घेऊन येणार्या पालकांचा राबता वाढला आणि त्यातून त्यांना हे डीअँडिक्शन सेंटर सुरू करावं लागलं.
आपली मुलं तासन्तास सोशल नेटवर्किंग साईट्सवर असतात, तासन्तास चॅटिंग करतात, फोनवर बोलतात, मोबाइल गेम्स खेळतात हे सांगणार्या पालकांनी शेवटी डॉक्टरांची मदत मागितली. त्याचदरम्यान बंगळुरूमध्ये एका तेरा वर्षाच्या मुलीनं आत्महत्त्या केली. आईनं फेसबुक वापरायला बंदी केल्याचा राग येऊन या मुलीनं स्वत:चा जीव घेतला. अनेक पालक त्यानं जास्तच हादरले. इथं काम करणार्या मानसोपचत्र तज्ज्ञांना या सार्याचा अंदाज होताच कारण किशोरवयीन मुलांमध्ये ज्या तीव्रतेनं इंटरनेट अँडिक्शनचं प्रमाण कसं वाढतंय याचा ते अभ्यास करत होतेच.
व्यसनी माणसू ज्या टोकाच्या पद्धतीनं रिअँक्ट करतो, तसंच ही मुलं रिअँक्ट करतील आणि ते घातक आहे, त्यांना योग्य मदत मिळून पुरेशी जनजागृती करणं आवश्यक आहे, असं लक्षात आल्यानंच हे टेक-डीअँडिक्शन सेंटर सुरू झालं.
आणि आजच्या घडीला मोठय़ा प्रमाणात तरुण आणि टीनएजर मुलं या केंद्रात उपचार घेत आहेत.
भावी डॉक्टरांना इंटरनेटचा आजार
इंदौरमध्ये मेडिकल स्टुडण्टच्या एका सर्व्हेक्षणाचा निष्कर्ष
इंटरनेट अँडिक्शन डिसऑर्डर. कुणाला गाठू शकते ही व्याधी?
- रिकामटेकड्यांना.?
ज्यांना काहीच काम नाही, अभ्यासात गती नाही, मन कशात रमत नाही.असे तरुण लवकर अँडिक्ट होत असावेत.
असा आपला एक समज आहे. प्रत्यक्षात तसं आहे का?
समाज ज्या तरुणांना हुशार समजतो, जी मुलं रात्रंदिवस अभ्यास करतात, त्यांची मोठी स्वप्न असतात.त्या मुलांनाही या व्याधीनं ग्रासलं तर? मुख्य म्हणजे त्यांना होऊ शकतं असं अँडिक्शन?
भोपाळमधल्या डॉक्टरांच्या एका ग्रुपला भेटलं तर या प्रश्नाचं उत्तर चटकन मिळेल. भोपाळमधल्या चिरायू मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये कम्युनिटी मेडिसिनचा एक विभाग आहे. त्या विभागातल्या डॉक्टरांसह इंदौरमधल्या काही डॉक्टरांनी आणि डॉक्टरकीचं प्रशिक्षण घेणार्या एका विद्यार्थिनीने मिळून मेडिकल कॉलेजात शिकणार्या मुलामुलींच्याच इंटरनेट वर्तनाचा अभ्यास केला. त्या अभ्यासावर आधारित त्यांचा रिपोर्ट नुकताच नॅशनल र्जनल ऑफ कम्युनिटी मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेला आहे.
वैद्यकीय शिक्षण घेणार्या, सदैव अभ्यासाचं ओझं वाहणार्या विद्यार्थ्यांना इंटरनेट वापर किती आहे आणि तो वापर अँडिक्टिव्ह आहे का? याबाबतचं हे संशोधन.
ते संशोधन करणारे चिरायू मेडिकल कॉलेजमधले असिस्टण्ट प्रोफेसर डॉ. अमित मालविय सांगतात, ‘आम्ही सलग सहा महिने या मुलांच्या वर्तनाचा अभ्यास करत होतो. त्यांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्याशी थेट बोलून, प्रश्न विचारून आम्ही माहिती संकलित करत होतो. अपेक्षेप्रमाणं इंटरनेट मॅराथॉन वापराचं प्रमाण तर होतंच, मात्र त्या वापरातून शंभरपैकी ८0 जण हे इंटरनेट अँडिक्ट होतील की काय? असं वाटावं इतका दीर्घ वापर ते इंटरनेटचा करताना आढळले. त्यातून त्यांच्या वर्तनातही जाणवण्याइतपत बदल आम्हाला दिसून आला.’
वर्तनबदल काय दिसले?
१ आपण नेटचा वापर किती काळ केला याचं या मुलांना भानच राहत नाही. सलग चार-चार तास नेटवर बसणारे अनेक जण. त्यातून त्यांना फटीग येणे, डोके दुखणे, डोळे चुरचुरणे, पाठदुखी असे किरकोळ आजारही सुरू झालेले दिसतात.
२ कॉलेजमधलं किंवा कॅम्पसजवळचं इंटरनेट बंद असलं, वीज नसली की ही मुलं हायपर व्हायची. ते आनंदानं गप्पा मारताहेत, हसताहेत हे चित्र कमी दिसू लागलं आणि ते चिडचिड करायचे, इरीटेट झालेले असायचे. निराश व्हायचे, बरंच काम पडलंय, नेट नाही तर कसं होणार म्हणत तक्रार करायचे.
३ या मुलांचा समंजसपणा, आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करण्याची वृत्तीही कमी झालेली दिसली. आमच्या कॉलेजात कॉम्प्युटरच चांगले नाहीत, त्यावरचे सॉफ्टवेअरच अपडेटेड नाही, कॉम्प्युटर लॅब जास्त वेळ वापरायची परवानगी द्यायला हवी. अशा तक्रारी ही मुलं करत. पण या वरवरच्या तक्रारी, मुळात कितीही काळ नेट वापरलं तरी त्यांचं मन भरत नसे, अजून हवं ही भावना प्रबळ असे हे त्यातून प्रकर्षानं दिसलं.
४ या मुलांची अभ्यासातली प्रगती तुलनेने घसरलेली होतीच, पण त्यांचं बाहेर फिरणं, लोकांशी बोलणं, जुन्या मित्रांकडे मैफली जमवणं हेही कमी झालेलं दिसलं. सदैव चिडचिड त्यांचा पिछा काही सोडत नव्हती.
. जिंदगी ऑफलाइन भी है.!
‘‘या मुलांना भेटून, बोलून आम्ही त्यांना एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत होतो की,
जिंदगी सिर्फ ऑनलाइन रहनेमें नही है, वो ऑफलाइन भी है और जादा सुंदर है.
पण या मुलांना इंटरनेटच्या जगात जी मजा येते,
ती असली आयुष्यात येत नाही हाच खरा प्रश्न होता.
खरंखुरं आयुष्य इंटरेस्टिंग करायचं कुणी या प्रश्नाचं उत्तर मात्र ते स्वत: शोधत नाहीत,
हीच अडचण आहे.’’
(लेखक हे असिस्टण्ट प्रोफेसर, कम्युनिटी मेडिसिन डिपार्टमेण्ट, चिरायू मेडिकल कॉलेज, भोपाल येथे कार्यरत आहेत. )