- भारत रावल
घराच्या भिंतींना आज म्युरल्सचा साज चढविला जातोय. म्युरल्स आता ‘स्टेटस सिम्बॉल’ बनले आहेत. याच म्युरल्सना थ्रीडी स्वरूपात सादर करतोय.
रेङिान क्ले, सिरॅमिक थ्रीडी म्युरल यांच्या कार्यशाळा घेतो. आयटी प्रोफेशनल्स, कलाशिक्षक, गृहिणी, हॉबी क्लासेसचे संचालक, इंजिनिअर्स, डॉक्टर्स अशा विविध क्षेत्रंतील 15 हजार कलाप्रेमींना म्युरल कलेचा वारसा दिलाय.
माङया वडिलांचे हस्तकलेच्या वस्तूंचे छोटे दुकान होते. विक्रीस ठेवलेल्या वस्तू न्याहाळत असताना ती कशी तयार केली गेली, याची माहितीही ते ग्राहकांना देत असत. यातूनच त्यांना हस्तकलेची आवड निर्माण होत गेली. मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून पदवीर्पयतचे शिक्षण घेतलं. पुण्यात येऊन पुन्हा वडिलांचं दुकान सांभाळलं. या दरम्यान म्युरलची कला शिकलो. पण म्युरल कलेला एका छोटय़ा दुकानात कोंडून उपयोग नाही, असं वाटू लागलं. म्हणून मग स्वतंत्र काम सुरू केले. 1985 मध्ये रेङिान क्ले (एक विशिष्ट प्रकारची माती) कलाकृतींचा शोध लावला. याशिवाय सिरॅमिक थ्रीडी म्युरल कलेलाही जन्म दिला. त्यानंतर देशभरात सिरॅमिक क्राफ्ट आर्ट हा प्रकार कलाप्रेमींमध्ये लोकप्रिय झाला. आज सिरॅमिक पावडरपासून अनेक कलाकृती निर्माण होऊ लागल्या आहेत.
‘चित्र आणि शिल्पकला यांचा संगम म्हणजे थ्रीडी म्युरल’. आपल्यापैकी अनेकांना या दोघांचीही आवड असते. मात्र दोन्ही कला तशा क्लिष्टच. म्हणून सर्वानाच ते जमते असे नाही. पण सर्वाना ते सहज जमावे म्हणूनच हे थ्रीडी म्युरल शोधून काढले. थ्रीडी म्युरलमधे सिरॅमिक पावडरपासून अनेक छोटी शिल्पे सोप्या रीतीने बनवून ती प्लायवूडवर चिकटवून रंगकाम केले जाते. निसर्ग देखावे, देवदेवतांची व्यक्तिचित्रे यात साकारली जातात. याचबरोबर थ्रीडी सायपोरेक्स, ग्लास (काच), मिक्स मीडिया म्युरल करता येतात.
या कलेने अपार समाधान, नवनिर्मितीचा आनंद दिला आहे.