अनेक तरुण उद्योजक मला विचारतात, ‘भांडवल कुठून आणू?’माझा त्यांना एक साधा सरळ प्रश्न असतो.‘भांडवल म्हणजे काय?’ते म्हणतात, ‘पैसा दुसरं काय?’
मला विचाराल तर उद्योगासाठी लागणारं भांडवल म्हणजे फक्त पैसा नव्हे. त्याहून बर्याच गोष्टी तुमच्यासाठी भांडवलाचं काम करतात.त्या भांडवलाची नीट गुंतवणूक केली तर तुमचा उद्योग चालेल काय, पळेलही.मात्र त्यासाठी भांडवल म्हणजे काय याचाही जरा आपण विचार करायला हवा.
त्यासाठी हे काही मुद्दे.
तुम्हीच ठरवा आता या सार्याला भांडवल म्हणायचं की नाही ते.
१) तुम्ही जे काम करायचं ठरवताय, त्यावर तुमची पक्की निष्ठा आहे की नाही हे ठरवा. ती निष्ठा आणि व्यवसाय करण्याची चिवट वृत्ती हे तुमचं खरं भांडवल.
२) आव्हानांचं संधीत रूपांतर करण्याची हातोटी हवी. संकट आलं, अडचण आली की वाटलंच पाहिजे की, ही तर पुढं सरकण्याची, नवीन उत्तरं शोधण्याची संधी आहे. त्या संधीचं सोनं करण्याची तयारी हे तुमचं भांडवल.
३) तुमच्या व्यवसायात सतत कल्पक बदल करण्याची, त्यात नावीन्य आणण्याची आणि त्यातून नव्या गोष्टी शिकण्याची वृत्तीही जोपासत राहिली पाहिजे तर काळानुरूप व्यवसाय बहरतो.
४) तुम्ही जे काम करताय, त्या कामाचा समाजावर काय परिणाम होतो आहे, लोकं तुमच्या व्यवसायाविषयी काय बरं-वाईट बोलतात याकडेही लक्ष असू द्या.
५) शिकणं थांबवू नका. व्यवसाय म्हटला की चुका होणारच. घाटाही होणारच. मात्र तो घाटा हा आपला नफाच आहे असं समजून ती चूक पुन्हा होणार नाही हे बघायचं.
६) व्यवसाय करताना तुमचा सिक्स सेन्स काय म्हणतो, तुम्हाला काय योग्य वाटतं ते ठरवून निर्णय घ्या. प्रोजेक्ट रिपोर्ट वाचा, विेषण करा. अभ्यास करा, पण निर्णय घेताना तुमच्या सिक्स सेन्सचंही जरा ऐकाच.
७) तुमच्या व्यवसायात तुमच्याबरोबर काम करणार्या माणसांचा सन्मान करा. त्यांच्या कौशल्यांचा आदर करा. त्यांनाही तुमच्याबरोबर मोठं होण्याची संधी द्या.
८) माणसांवरचा भरवसा आणि त्यांची साथ याहून मोठं भांडवल दुसरं नाही.
९) व्यवसायात भरभराट होऊ लागली की, आपण समाजासाठी काही करणं लागतो हे लक्षात ठेवून यश वाटून घ्यायला शिका.
१0) सगळ्यात महत्त्वाचं आपण व्यवसाय करतोय ते पैसे कमावण्यासाठी हे डोक्यातून काढून टाका. तुमच्या कामात उत्तम दर्जा, मनासारखं समाधान मिळवण्यासाठी कष्ट करा. पैसे कमवण्यावरचा फोकस काढला की, व्यवसाय जास्त चांगला चालतो.
- किरण मुजुमदार शॉ, उद्योजक.
(किरण मुजुमदार शॉ यांनी त्यांच्या ब्लॉगवर उभरत्या उद्योजकांसाठी दिलेली ही यशाची काही सूत्रं.)