- वल्लरी चवाथे
आजकाल आपण अनेकदा ऐकतो अमक्या तमक्याने क्विलिंगचे डेकोरेशन केले आहे. हिने क्विलिंगपासून कार्ड तयार केले आहे असे एक ना अनेक वेळा हा शब्द ऐकायला मिळतो. पण ‘क्विलिंग’ म्हणजे नेमके काय असा आपल्यातील अनेकांना हा प्रश्न पडत असेलच. तर क्विलिंग म्हणजे कागदाच्या वेगवेगळ्या आकाराच्या स्ट्रिपचे वेगवेगळे आकार बनवायचे.
या स्ट्रिपची जाडी आणि कागदाची जाडी यानुसार या स्ट्रिप कापल्या जातात. या कागदाच्या पट्टय़ा 10 मिमी ते 1 मिमीर्पयत क्विलिंगसाठी वापरल्या जातात. गरजेप्रमाणो आणि आवडीनुसार त्या वापरल्या जातात. या पट्टय़ा वेगवेगळ्या आकारात वळवून त्यापासून आणखी वेगळी कलाकृती तयार केली जाते. प्लेन कागदाच्या किंवा क्रिम्प केलेली म्हणजेच वेडीवाकडी कापलेली स्ट्रिप अशा दोन प्रकारातल्या पट्टय़ा क्विलिंगसाठी वापरतात. यापुढे जाऊन प्रिंजेस. कागदाच्या स्ट्रिपचे प्रिंजेस काढून पॉम-पॉमसारखे वळवून ते वापरता येतात.
मी जेव्हा क्विलिंग शिकायला सुरुवात केली तेव्हा क्विलिंगचे दागिनेच बनवायला सुरुवात केली. जितका कमी जाडीचा कागद तितकाच सुडौल आणि नाजूक दागिना तयार होतो.
मला फेसबुकमुळे क्विलिंग या प्रकाराची ओळख झाली. माझी एक पुण्यातील मैत्रीण हे करत होती. तिने एकदा स्वत: तयार केलेले क्विलिंगचे दागिने फेसबुकवर टाकले. याचबरोबर तिने त्याची जाडी कम्पेर करण्यासाठी दोन रुपयांचे नाणोही सोबत टाकले होते. ते पाहून मी आश्चर्यचकित झाले. आणि कुतूहल निर्माण होऊन मी इंटरनेटवर याविषयीची माहिती मिळवली. मी यूटय़ूबवर क्विलिंगचे दागिने तयार करण्याच्या स्टेप्स पाहिल्या. त्यानंतर मी हळूहळू शिकत एक-दोन कानातले बनवले. नंतर ते मी स्वत: वापरायला लागले. माङया मैत्रिणींनीही ते पाहिले आणि त्यांनाही आवडले. मग मी त्यांना भेट म्हणून देत गेले.
सुरुवातीला कामात परफेक्टनेस नव्हता. पण आवड म्हणून मी ते तयार करत होते. एकदा मी प्रदर्शन पाहायले गेले असता तेथे क्विलिंगच्या दागिन्यांचा स्टॉल लागला होता. मी त्या महिलेकडे अॅडव्हान्स कोर्स केला. तिने मला काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आणि माङया क्विलिंगमधे फिनिशिंग आली.
क्विलिंगपासून काहीही बनवता येऊ शकते. कानातले, कुंदन-जडाऊसारखे दिसणारे दागिन्यांचे सेट, ग्रीटिंग कार्ड, एनव्हलप, थ्रिडी बॉक्स, डेकोरेटेड बॉक्सेस, भिंतीवरचे घडय़ाळ, मनगटावरील घडय़ाळ सजवू शकतो. तसेच फोटोफ्रेमही सजवू शकतो. तसेच थ्रीडी प्रोजेक्ट्स म्हणजे गार्डनमध्ये टी पार्टी सुरू आहे असे दाखवू शकतो. किंवा लग्नासाठी किंवा वाढदिवसाप्रीत्यर्थ थीमप्रमाणो हे प्रोजेक्ट तयार करता येऊ शकतात. थ्रीडी बॉक्स म्हणजे एक्सप्लोजन बॉक्स. म्हणजेच बॉक्स उघडला की छान-छान वस्तू बाहेर येत थ्रीडीचं, यातही क्विलिंगचा वापर करता येतो.
सुरुवातीला मी गंमत म्हणून क्विलिंगची सुरुवात केली. मला ते रंगीबेरंगी कागद, त्यापासून तयार होणारे आकार सर्व टेन्शन दूर करायचे. त्यातून मी काही बनवते हा आनंद मिळत गेला. त्यामुळे क्विलिंग माङयासाठी एक स्ट्रेस बस्टर ठरत गेला.
क्विलिंगपासून आर्थिक उत्पन्नही होऊ शकते. फार मोठय़ा प्रमाणात व्यवसाय होऊ शकतो असे नाही. पण छोटय़ा-मोठय़ा वस्तू विकून किंवा याचे अॅडव्हान्स कोस्रेस शिकवूनही थोडेफार आर्थिक हातभार लागू शकतो. छोटेखानी व्यवसाय म्हणून याकडे बघता येऊ शकतं.
पण त्याहीपेक्षा या वस्तू बनवण्यातली कला जो आनंद देते, तो मात्र नितांत सुंदर आहे.