- लीना पोटे
स्टोन पेंटिंग ही कला तशी फार जुनी आहे. आपल्याकडे दगडाला शेंदूर लावून देव म्हणून पूजण्याची प्रथा फार पूर्वीपासून चालत आली आहे. याच कल्पनेतून एकदा सहज म्हणून मी माङयाकडे असलेला एक पेबल म्हणजेच दगड रंगवून पाहिला. आणि तो सर्वाना खूप आवडला. मला मिळालेल्या कौतुकाने आणखी उभारी मिळाली आणि मी इंटरनेटवर याविषयी माहिती घेतली. साधारणत: दहा वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. मी एक कमर्शियल आर्टिस्ट आहे. त्यामुळे मला स्टोन पेटिंग या कलाप्रकारात अधिकच रस निर्माण होत गेला.
हल्ली इंटिरियर डिझाइनिंगसाठी पेबल्सचा वापर अधिक केला जातो. गार्डनिंग किंवा टेरेस गार्डनिंग असो किंवा घरातील टेबल, टीपॉयमधे रंगवलेले पेबल्स ठेवले जातात. स्पिरीच्युअल किंवा मेडिटेशन अशा थीम ठरवूनही त्याप्रमाणो डिझाइन केले जातात. हल्ली पेबल्सचा दागिन्यांमध्येही वापर केला जातो. ब्रेसलेट, नेकलेस, कानातले यामध्ये कावर्ि्हगमधे त्याचा वापर केला जातो.
लहान-लहान दगडांचा पेपर वेट किंवा फ्रीजवर लावायचा मॅग्नेट म्हणूनही वापर केला जातो. त्यावर अॅबस्ट्राक्ट पंेटिंग करून ते रंगवले जातात.
मुंबईसारख्या ठिकाणी गार्डनसाठी मोठी जागा उपलब्ध नाही. पण छोटय़ा जागेतही छान सजावट करता येते. छोटीशी हिरवीगार बागही खूप सुख देते. तिथेच एखादा पक्षी बनवला तर अधिक सुंदर वाटतं. आध्यात्मिक वातावरणातील घरांमध्ये फेंगशुई किंवा तत्सम वस्तू पेबल आर्टने सजवल्या जातात. अशाच वेगवेगळ्या थीम ठरवून पेबल पेंटिंग केलं जातं.
पेबलचं कोणतंही मोठं मार्केट नाही. आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो तेथे अनेक आकारात दगड दिसतात. त्यातील कोणत्याही आकाराच्या पेबलवर तुम्हाला हवं तसं पेंटिंग करता येऊ शकतं. हल्ली फर्निचर डिझाइनच्या दुकानांत असे पेबल्स मिळतात. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पेबल निवडून ते सजवू शकतात.
दगडात अक्षरश: जीव ओतण्याचं काम आपले रंग करतात.
ती मजा सांगण्यात नाही, अनुभवण्यातच आहे!