कुणी सांगितलं की, लहानग्या पोरांच्या शाळा प्रवेशालाच आईबाबा जाम अधीर होतात.
मोठं होता होता, म्हणजे एकदम नववीत किंवा मग अकरावीतही गेल्यावर अनेक मुलामुलींना वाटू लागतं की, आपल्या आईबाबांचं चुकलंच. आपल्याला कसल्या ‘देसी’ बोर्डात घालून ठेवलंय.
म्हणून मग अनेक जण आईवडिलांच्या मागे लकडा लावतात की मला ‘आयबी’च पाहिजे. काही जण तर आईवडिलांना सांगायचेही कष्ट घेत नाहीत आणि परस्पर इंटरनॅशनल बोर्ड घ्यायचंच, असा निर्णय घेऊन मोकळे होतात. ‘आयबी’ किंवा ‘आयजीएसई’ बोर्ड घ्यायचं ही आजकालची फॅशन असल्यासारखी पोरं हीच बोर्ड पाहिजे म्हणून हटून बसतात. एरवी आईवडील कशाला मुलांना इंटरनॅशनल बोर्ड घेऊ नको म्हणतील? पण ते नाही म्हणतात ते एकाच गोष्टीमुळे, ते म्हणजे पैसा. किमान ६ ते ९ लाख रुपये या बोर्डांची वर्षाची फी असते. अनेक पालकांना तेवढा पैसा उभं करणंही शक्य नसतं. मग कर्ज काढा, सोनं गहाण ठेवा असं करून पालक मुलांचा हट्ट पूर्ण करतात.
देशाबाहेर शिकायला किंवा नोकरीला जायचं तर एवढं करायलाच हवं, ही त्यामागची भावना. खरंतर शिकायलाच?
अनेक मुलामुलींचं हल्ली ठाम मत आहे की, आपण इथे इंटरनॅशनल बोर्ड घेतलं की इथली डिग्री घेतली की पुढचं पाऊल थेट देशाबाहेरच्याच एखाद्या बड्या युनिव्हर्सिटीत. आपण डायरेक्ट ग्लोबल सिटीझनच होऊ.
प्रत्यक्षात सगळ्यांचंच तसं होत नाही. स्वप्न विदेशाची पडत असली तरी प्रत्यक्षात तो अभ्यासक्रम झेपत नाही, आईवडील कर्जात डुबतात. काही जणं तर नापास होतात.
आणि शेवटी निराशेच्या गर्तेत जातात.
इंटरनॅशनल बोर्डांचं हे अतिरेकी स्वप्नाळू भूत आपल्याला खरंच काही ‘शिकवतं’ का, जगाच्या स्पर्धेत उभं रहायला लायक बनवतं का?
हे तपासून पहायला हवं.
नाहीतर तेल -तूप -धुपाटण्यासह सगळंच गमावण्याची पाळी आज अनेकांवर येते आहे.