कॉलेज सुरू होता होता अनेकांना वाटायला लागतं की आता हा आपला जुनाट डब्बा मोबाइल फेकून द्यावा. स्मार्टफोन घ्यावा. काही जण तर हट्टानं फोन घेताताच. अनेकांना नवा टॅब किंवा लॅपटॉपच हवा असतो.
पण समजा, कुणी आपल्याला विचारलंच की, करणार काय तू या स्मार्टफोनचं? काय काय वापरतो यातलं? ‘स्मार्ट यूज’ काय आहे या फोनचा?
तर आपल्याकडे काही उत्तर नसतंच. आपण नुसतेच हट्ट करतो. पैसे खर्च करतो. आईबाबांच्या मागे लागून, मित्रानं जो मोबाइल घेतला तोच विकत घेतो.
पण त्याचं फारसं काही करत नाही. म्हणजे जी टेक्नॉलाजी हातात आहे, तिचा आपल्याला काही खास वापर करून, आपल्या ज्ञानात भर घालता येत नाही.
तुमच्या नव्या आणि जुन्या मोबाइलचाही अत्यंत ‘स्मार्ट’ वापर करता येऊ शकतो. वर्षभर कॉलेजात आपण एकदम ट्रेण्डी ठरू असे अँप्स डाउनलोड करून घेऊन एकदम स्टायलिश ठरू शकतो.
त्यासाठीच तर ही एक छोटीशी मदत. बी स्मार्ट, यंदा कॉलेजात जाताना निदान हे काही अँप्स तरी तुमच्या मोबाइलमध्ये ठेवाच.
- अमृता दुर्वे
एव्हरनोट
काही अँप्स अशी असतात ज्यांना आपण ‘मस्ट हॅव’ अँप्स असं म्हणू शकतो. म्हणजे असं अँप्लिकेशन जे प्रत्येकाच्या फोनवर असायलाच हवं. त्यातलंच एक अँप आहे - एव्हरनोट. याची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ते ऑलमोस्ट सगळ्या गॅजेट्सवर वापरता येतं. म्हणजे कॉम्प्युटर, मोबाइल फोन - टॅब्लेट कशावरही तुम्ही हे अँप डाउनलोड करू शकता. वेगवेगळ्या गोष्टींची नोंद करून ठेवण्यापासून तुमची महत्त्वाची डॉक्युमेंट्स ऑर्गनाईज करून ठेवण्यासाठी तुम्ही या अँपचा वापर करू शकता. महत्त्वाची कागदपत्रं म्हणजे तमाम दाखले, ओळखीचे पुरावे, असं बरंच काही तुम्ही इथं स्टोअर करू ठेवू शकता.
अँप डाउनलोड केल्यावर तुम्हाला तुमचं अकाउंट तयार करावं लागेल. यात टेक्स्ट एडिटर, फोटो अलोडर आणि व्हॉईस रेकॉर्डर आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी विविध स्वरूपात इथे सेव्ह करू शकता. आणि नंतर सर्च करू शकता. तुमच्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी इथे सेव्ह करून ठेवल्या तर ऐनवेळेस, घाईच्या वेळेस अजिबात शोधाशोध, पळापळ करावी लागणार नाही.
इथे तुम्ही तुमचं डॉक्युमेंट तयार करून शेअर करू शकता. शाळा - कॉलेजमध्ये असाल तर नोट्स घेऊन एकमेकांसोबत शेअर करायला हे एक उत्तम माध्यम आहे.
हे क्लाऊड कॉम्प्युटिंग अँप असल्याने तुमचा सगळा डेटा इंटरनेट सर्व्हरवर साठवला जातो. त्यामुळे हे अँप तुमच्या गॅजेट्समधली फार जागा तर खात नाहीच पण या क्लाऊड कॉम्प्युटिंगमुळे तुम्हाला तुमचा डेटा कधीही, कुठल्याही डिव्हाईसवरून अँक्सेसही करता येऊ शकतो.
एव्हरनोटची बेसिक व्हर्जन डाउनलोडसाठी फ्री आहे. आणि जर का तुम्ही तुमच्या सगळ्या नोट्स इथे घेणार असाल किंवा इथली फ्री मेमरी अपुरी पडायला लागली तर तुम्ही थोडे पैसे भरून पेड व्हर्जनही डाउनलोड करू शकता.
वर्ल्ड मॅप अँटलास २0१४
भूगोल इंटरेस्टिंग बनवणारे हे एक अँप. जगातल्या सगळ्या देशांविषयीची माहिती तुम्हाला या अँपमधून मिळेल. प्रत्येक देश, त्याचा झेंडा, जगाच्या नकाशातलं त्याचं स्थान, त्यांचं राष्ट्रगीत, नद्या, पर्यटन स्थळं या सगळ्याविषयीची माहिती या अँपमधून मिळेल. त्यामुळे नो युवर वर्ल्ड असं म्हणायला हे अँप एकदम खासच आहे.
डिक्शनरी
नेहमी हमखास लागणारी ही गोष्ट. यासाठी डिक्शनरी डॉट कॉम किंवा ऑक्सफर्ड डिक्शनरी या दोन्हींची अँप्स छान आहेत. शब्दांचे अर्थ सांगण्यासोबतच ही अँप्स तुम्हाला रोज एक नवा शब्द शिकवतील आणि त्याचा अर्थही सांगतील. त्यामुळे इंग्रजी सुधार कार्यक्रम डोक्यात असेल तर टाइमपास करण्याच्या वेळेत हे अँप वापराच वापरा.
स्कूल्स ए टू झेड
तुम्ही म्हणाल कॉलेजात जाताना हे शाळकरी नावाचं अँप कशाला? पण हे अँप भन्नाट आहे. शाळेत जाणार्या मुलांसोबतच कॉलेजात जाणार्या मुलामुलींनाच काय पण त्यांच्या आईबाबांनाही हे अँप एकदम उपयुक्त आहे. यात इंग्लिश, मॅथ्स, टेक्नॉलॉजी, स्पेलिंग्ज यासाठीच्या लहान लहान टेस्ट आहेत. शिवाय लहान मुलांच्या अभ्यासात वापरल्या जाणार्या संज्ञांचे अर्थ आहेत. ज्यांना मराठी माध्यमातून कॉलेज पाऊल ठेवताच इंग्रजीची भीती वाटते त्यांच्यासाठी हे एक उत्तम अँप आहे. त्याशिवाय तुम्ही यात असाइनमेंटस्ची नोंद करून ठेवू शकता. अँण्ड्रॉईड आणि अँपल स्टोअरमध्ये हे अँप फ्री उपलब्ध आहे.
पिरियॉडिक टेबल
अकरावीत सायन्सला जाणार्या मुलामुलींसाठी हे अँप म्हणजे हक्काची मदत असं समजा. पिरियॉडिक टेबल लक्षात ठेवण्यासाठी हे अँप मदत करेल. यात तुम्हाला प्रत्येक मूलद्रव्याची सगळी माहिती मिळेल. शिवाय एक क्विझ घेऊन तुम्ही झालेल्या अभ्यासाची रिव्हिजनही करू शकता.