लंडन/वेलिंग्टन : ‘‘माझे नाव ल्यू व्हिन्सेंट ! होय मी दगाबाज आहे! मी फिक्सिंग केले आणि पैशाच्या हव्यासापोटी व्यावसायिक खेळाडू या नात्याने स्वत:च्या पदाचा दुरुपयोगही केला!’’ हे उद्गार आहेत न्यूझीलंडचा दोषी क्रिकेटपटू ल्यू व्हिन्सेंट याचे. मंगळवारी त्याने जाहीर कबुली दिली. क्रिकेट आणि आपल्या देशाची मान शरमेने खाली झुकवण्याचे पाप केल्याबद्दल त्याने मनापासून माफी मागितली. तरीही अवघ्या काही तासांत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर आजीवन बंदी घातली.भावनात्मक वक्तव्य करीत तो म्हणाला, ‘‘गेली अनेक वर्षे माझ्या मनात सल होती. खरे काय ते सांगून टाकण्याचा मी काही दिवसांआधीच निर्धार केला. मी देशाची आणि क्रिकेटची मान खाली झुकवली. माझ्या आप्तेष्टांचाही विश्वास गमावला.’’ व्हिन्सेंटच्या कबुलीजबाबानंतर काही तासांतच त्याच्यावर आजीवन बंदी लागू करण्यात आली. ईसीबीने व्हिन्सेंटच्या शिक्षेची घोषणा करताना त्याने ईसीबीच्या भ्रष्टाचारविरोधी नियमांचा भंग केल्याची कबुली दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले.व्हिन्सेंट एकूण १८ नियमांत दोषी आढळला. त्यापैकी चार नियम लंकाशायर आणि डरहमदरम्यान जून २००८ साली झालेल्या टी-२० लढतीशी संबंधित आहेत. अन्य १४ आरोप होव येथे २०११ साली खेळविण्यात आलेल्या दोन सामन्यांशी संबंधित आहेत. याशिवाय चॅम्पियन्स लीग टी-२० मध्ये स्पॉट फिक्सिंगशी संबंधित सात आरोपांत दोषी धरण्यात येऊन आजीवन बंदी घालण्यात आली आहे. द. आफ्रिकेत २०१२ साली झालेल्या चॅम्पियन्स लीगच्या दोन सामन्यांत अफरातफर केली शिवाय अवैध आयसीएल क्रिकेटमध्ये त्याने फिक्सिंग केल्याची कबुली दिली होती. गतवर्षी बांगलादेश प्रीमियर लीगदरम्यान सट्टेबाजांनी त्याच्याशी संपर्क केला, हे त्याने प्रशासनाला कळविले नसल्याचाही ठपका आहे. न्यूझीलंडकडून २३ कसोटी सामने खेळणारा ३५ वर्षांचा व्हिन्सेंट म्हणाला, ‘‘माझा स्वत:वरील विश्वास संपला. ज्या खेळाला चाहतो त्याच खेळाशी मी दगाबाजी केली. मी जे केले त्याची सत्यता पुढे आणली आहे.’’ ईसीबीने त्याच्यावर जे १८ आरोप लावले त्यापैकी ११ मध्ये आजीवन बंदीच्या शिक्षेची तरतूद आहे. यामुळे तो ईसीबी, आयसीसी किंवा अन्य क्रिकेट बोर्डांद्वारे आयोजित सामन्यात भाग घेणार नाही किंवा क्रिकेटशी संबंधित अन्य कार्यात सहभागी होऊ शकणार नाही. या बंदीला ईसीबीच्या स्वतंत्र क्रिकेट शिस्तपालन आयोगाची मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. ‘‘मी जे काही केले त्याचा आयुष्यभर पश्चात्ताप असेल. जे खेळाडू भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकतात त्यांच्यासाठी माझे प्रकरण सावध करण्याचे काम करेल, असा मला विश्वास वाटतो. दीर्घकाळानंतर भविष्याबद्दल सकारात्मक बनलो आहे. चुकांचे परिमार्जन करीत त्या सुधारण्यावर भर देणार आहे. मी बराच काळ मान खाली घालून राहायचो. आता ताठ मानेने चालू शकेल. जी शिक्षा मिळेल ती भोगण्यास तयार आहे. पूर्णपणे माझी चूक असल्याने पुन्हा या खेळात उभा राहू शकणार नाही. भविष्यातील खेळाडू घडविण्यासाठी मी आपल्या कौशल्याचा वापर करू शकणार नाही. पण एक खरे की पुढच्या पिढीला चुकीचे काम करण्यापासून मी परावृत्त मात्र करू शकतो.’’ (वृत्तसंस्था)
होय, मी दगाबाज फिक्सर! - ल्यू व्हिन्सेंट
By admin | Updated: July 2, 2014 03:08 IST