मुंबई : राष्ट्रीय महासंघावर बंदी असल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून नाचक्कीचा सामना करीत असलेल्या भारतीय बॉक्सिंगचा अखेर नवोदय झाला. आंतरराष्ट्रीय स्थरावर झालेल्या नाचक्कीतून शिकवण घेत बॉक्सिंग इंडिया या नव्याने स्थापन झालेल्या संघटनेची गुरुवारी मुंबईत निवडणुक पार पडली. यात संदीप जजोडीया यांची अध्यक्षस्थानी बिनविरोध, तर मुंबईकर जय कवळी यांची सचिवपदी निवड झाली. खजिनदार म्हणून हेमंत कुमार कलिता यांना कारभार पहावा लागणार आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेचे (आयबा) पर्यवेक्षक कायदे व्यवस्थापक क्लायडोन गाय आणि विश्व संस्थेत भारताचे प्रतिनिधी असलेले किशन नरसीच्या देखरेखीखाली पार पडलेल्या या निवडणुकीचा अहवाल आयबाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे बॉक्सिंग इंडियाला अधिकृत संघटनेची मान्यतेसाठी आयबाच्या निर्णयाची प्रतीक्षा पाहावी लागणार आहे.आशियाई स्पर्धेतील सहभागाविषयी साशंकताबॉक्सिंग इंडियाची स्थापना जरी झाली असली तरी त्यांचा अद्याप आयबाकडून मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे आशियाई स्पर्धेत बॉक्सिंग संघाच्या सहभागाबाबत अजूनही साशंकता आहे. यावर विश्व संस्थेत भारताचे प्रतिनिधी किशन नरसी म्हणाले, आशियाई स्पर्धेकरिता १३ बॉक्सर्सचा चमूंच्या नावाची घोषणा करण्यात आली असून ते दिल्ली आणि पटियाला येथे कसून सराव करत आहेत, परंतु त्यांच्या सहभागाविषयी अद्याप काहिच सांगता येणार नाही. बॉक्सिंग स्पर्धा २३ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याने बराच वेळ बॉक्सिंग इंडियाकडे आहे.