ऑनलाइन लोकमत
अॅडलेड, दि. १३ - मुरली विजय (९९) व विराट कोहलीच्या (१४१) झुंजार खेळीनंतरही भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ४८ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. तळाच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी न केल्याने भारताचा डाव ३१५ धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाच्या लिऑनने ७ बळी टिपत भारताचा डाव गुंडाळला.
ऑस्ट्रेलियाने भारतासमोर जिंकण्यासाठी ३६४ धावांचे आव्हान ठेवले होते. धवन (९) व पुजारा (२१) पटापट बाद झाल्यानंतर मुरली विजय (९९) व विराट कोहली (१४१) यांची जोडी जमली. त्यांनी शानदार खेळ करत भारताला विजयाच्या समीप नेले. कर्णधार म्हणून पदार्पण करणा-या कोहलीने या कसोटीत दोन्ही डावात शतके ठोकली. मुरली विजयही शतकाच्या अगदी जवळ होता. मात्र ९९ धावावंर असताना लिऑनच्या चेंडूवर तो पायचीत झाला. नंतर आलेला रहाणे शून्यावर तर रोहित शर्मा ६ धावांवर बाद झाला. भारतीय फलंदाज एका पाठोपाठ तंबूत परतत असताना विराटने कर्णधाराला साजेसा खेळ करत भारताची बाजू सावरून धरली होती. मात्र तो १४१ धावांवर असताना बाद झाला व त्यानंतर टीम इंडियाचा डाव गडगडला. शमी (५), अॅरॉन शर्मा (१) व इशांत शर्मा( १) हे खेळाडू फक्त हजेरी लावून तंबूत परतले. भारताला विजयासाठी अवघ्या ४८ धावांची गरज असताना भारताचे सर्व फलंदाज बाद झाले व चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने खिशात टाकत १-० अशी आघाडी मिळवली.
लिऑनने ७, जॉन्सनने २ तर हॅरीसने १ बळी टिपला.