ऑनलाइन टीम
सावो पावलो, दि. २० - लुईस सुवारेझच्या दोन गोलमुळे उरुग्वेने इंग्लंडवर २-१ असा सनसनाटी विजय मिळवला. या पराभवामुळे इंग्लंडचे फिफा विश्वचषकातील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. अंतिम १६ मध्ये स्थान पटकवाण्यासाठी आता इंग्लंडला अन्य संघाच्या कामगिरीवर विसंबून राहावे लागणार आहे.
गेल्या महिन्यात गुडघ्यावर शस्त्रक्रिया झालेला उरुग्वेचा लुईस सुवारेझ पुन्हा मैदानावर परतला होता. मात्र कोस्टा रिकाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात तो मुकला होता. या सामन्यात त्यांना कोस्टारिकाकडून ३-१ असा पराभव सहन करावा लागला होता. गुरुवारी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात उरुग्वेचा फॉरवर्ड प्लेअर लुईस सुवारेझ संघात परतला. लुईसने ३९ पहिला गोल करुन उरुग्वेचे खाते उघडले. ७७ व्या मिनीटाला इंग्लंडचा स्ट्रायकर रुनीने एक गोल मारुन इंग्लंडला बरोबरीत आणले होते. सामना बरोबरीत सुटेल अशी चिन्हे असतानाच ८५ व्या मिनीटाला लुईसने पुन्हा एकदा गोल करुन संघाला निर्णायक आघाडी मिळवून दिली.
दरम्यान, गुरुवारी ग्रुप सीमध्ये जपान विरुद्ध ग्रीस हा सामना पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला.