भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झा व रोहन बोपन्ना यांनी आपापल्या सहकाऱ्यांसह विजय मिळवत दुहेरीमध्ये उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सानिया व स्वित्झर्लंडची तिची सहकारी मार्टिना हिंगिस या अव्वल मानांकित जोडीने महिला दुहेरीत स्विस खेळाडू टिमिया वासिन्स्की व चिनी ताइपेची चिया जुंग चुआंग या जोडीचा ६-१, ६-१ ने पराभव केला. सानिया-हिंगीस जोडीला पुढच्या फेरीत १३ वे मानांकनप्राप्त नेदरलँडची मिशेला क्राइसेक व चेक प्रजासत्ताकची बारबोरा स्टरिकोव्हा यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. सानिया-हिंगीस जोडीला ब्रेक पॉर्इंटच्या ७ संधी मिळाल्या; त्यापैकी ५ संधीवर त्यांनी गुण वसूल केला. त्यांनी १८ निवर लगावताना प्रतिस्पर्धी जोडीवर वर्चस्व गाजवले. पुरुष दुहेरीमध्ये रोहन बोपन्ना व रोमानियाचा फ्लोरिन मर्जिया या सहाव्या मानांकित जोडीने पोलंडच्या मारिस्ज फ्रिस्टनबर्ग व मॅक्सिकोचा सॅन्टियागो गोंजालेज यांचा ६-३, ७-६ ने पराभव करीत पुढच्या फेरीत स्थान मिळवले. बोपन्ना-मर्जिया जोडीला पुढच्या फेरीत कॅनडाच्या डॅनियल नेस्टर व फ्रान्सचा एडुआर्ड रोजर व्हेसलिन या जोडीसोबत लढत द्यावी लागणार आहे. लिएंडर पेस आणि स्पेनचा त्याचा जोडीदार फर्नांडो वर्डास्को यांना शुक्रवारी पुरुष दुहेरीमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता, तर सानिया व ब्राझीलचा तिचा सहकारी ब्रुनो सोरेस यांना मिश्र दुहेरीच्या पहिल्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता.
सानिया व बोपन्नाची दुहेरीत आगेकूच
By admin | Updated: September 7, 2015 00:11 IST