रांची : गोलंदाजांच्या अचूक मार्यानंतर सलामीवीर ख्रिस गेल (४६) आणि एबी डिव्हिलियर्स (२८) यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने आज, रविवारी खेळल्या गेलल्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्जचा पाच गडी राखून पराभव केला आणि आयपीएलच्या सातव्या पर्वात प्ले-आॅफ फेरी गाठण्याच्या आशा कायम राखल्या. या विजयासह बेंगळूर संघाच्या खात्यावर १० गुणांची नोंद असून गुणतालिकेत हा संघ पाचव्या स्थानी दाखल झाला आहे. चेन्नई संघाचा ११ सामन्यांतील हा तिसरा पराभव ठरला. गुणतालिकेत दुसर्या स्थानावर असलेल्या चेन्नईच्या खात्यावर १६ गुणांची नोंद आहे. बेंगळूर संघाने चेन्नईचा डाव ४ बाद १३८ धावांत रोखला आणि विजयासाठी आवश्यक धावा १९.५ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना बेंगळूर संघाच्या विजयात गेल (४६ धावा, ३ चौकार, ३ षट्कार), कर्णधार कोहली (२७ धावा, १ चौकार, १ षट्कार),डिव्हिलियर्स (२८ धावा, १४ चेंडू, १ चौकार, ३ षट्कार) व युवराज (नाबाद १३ धावा, १ षट्कार) यांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्याआधी, गोलंदाजांच्या अचूक मार्याच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाने चेन्नई सुपरकिंग्जचा डाव ४ बाद १३८ धावांत रोखला. चेन्नईतर्फे सुरेश रैनाने ४८ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकार व १ षटकाराच्या साहाय्याने नाबाद ६२ धावांची खेळी केली. रैनाने डेव्हिड हसीसह तिसर्या विकेटसाठी ५९ चेंडूंमध्ये ७५ धावांची भागीदारी केली. आयपीएलच्या सातव्या पर्वात पहिली लढत खेळत असलेल्या हसीने २९ चेंडूंमध्ये २५ धावा फटकाविल्या. बेंगळूरतर्फे वरुण अॅरोनने ३ षटकांत २९ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. अबू नाचिम (१-१८), मुरलीधरन (१-२९) यांनी त्याला योग्य साथ दिली. (वृत्तसंस्था)
रॉयल चॅलेंजर्सच्या आशा कायम
By admin | Updated: May 19, 2014 04:31 IST