पॅरिस : विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला स्वीत्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याला फे्रंच ओपन टेनिस स्पर्धेत पराभवाची नामुष्की ओढावली़ त्याला लाटवियाच्या अर्नेस्टस् गुलबीस यांच्याकडून मात खावी लागली़ अन्य लढतीत विम्बल्डन चॅम्पियन ब्रिटनच्या अँडी मरे याने चौथ्या फेरीत स्थान निश्चित केले़ झेक प्रजासत्ताकच्या टॉमस बेर्डीच याने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला़ अनुभवी रॉजर फेडरर याला एकेरीतील १७ वे मानांकन प्राप्त लाटवियाच्या अर्नेस्टस् गुलबीस याच्याकडून ६-७, ७-६, ६-२, ४-६, ६-३ अशा गुण फरकाने मात करीत स्पर्धेत धक्कादायक निकालाची नोंद केली़ पुरुष गटातील एकेरी लढतीत मरे याने लौकिकास साजेसा खेळ करताना शनिवारी अर्धवट राहिलेल्या सामन्यात जर्मन खेळाडूंवर ३-६, ६-३, ६-३,४-६, १२-१० असा विजय मिळवीत स्पर्धेत आगेकूच केली़ पुढच्या फेरीत त्याला स्पेनच्या फर्नांडो वर्दास्कोशी सामना करावा लागेल़ वर्दास्को याने अन्य लढतीत फ्रान्सच्या रिचर्ड गास्केटवर सरळ सेटमध्ये ६-३, ६-२, ६-३ अशी सरशी साधली़ झेक प्रजासत्ताकच्या टॉमस बेर्डीच याने उत्कृष्ट खेळ करताना अमेरिकेच्या जॉन इस्नरला ६-४,६-४,६-४ अशी धूळ चारत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला़ इस्नरच्या पराभवामुळे स्पर्धेच्या पुरुष गटातील एकेरीत आता अमेरिकेचे आव्हान संपुष्टात आले आहे़ महिला गटात आठवे मानांकन प्राप्त जर्मनीच्या अँजेलिक केर्बर हिला पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे स्पर्धेतून बाहेर होण्याची नामुष्की ओढावली़ तिला कॅनडाच्या युजिनी बुकार्ड एकतर्फी लढतीत ६-१,६-२ अशी मात खावी लागली़ विशेष म्हणजे बुकार्ड हिने यावर्षी आॅस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला होता़ मात्र, तिला चीनच्या लि ना हिच्याकडून मात खावी लागली होती़ (वृत्तसंस्था)
रॉजर फेडरर पराभूत
By admin | Updated: June 2, 2014 06:51 IST