अहमदाबाद : इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) प्ले-आॅफमध्ये पोहोचण्याचे मुंबई इंडियन्सचे स्वप्न जवळपास धुळीस मिळाले आहे़ मात्र, उद्या, सोमवारी मुंबईविरुद्धच्या लढतीत विजय मिळवून राजस्थान रॉयल्स संघ आपला प्ले-आॅफचा दावा मजबूत करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे़ राजस्थानने आतापर्यंत आयपीएलमध्ये ११ सामन्यांत ७ विजय मिळविले आहेत़ हा संघ गुणतालिकेत १४ गुणांसह तिसर्या क्रमांकावर विराजमान आहे़ आणखी एक विजय मिळवून या संघाचा प्ले-आॅफसाठी दावा मजबूत होणार आहे़ मात्र, जर या सामन्यात त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले तर पुढील दोन सामने त्यांच्यासाठी ‘करा अथवा मरा’ असे ठरणार आहेत़ गतविजेत्या मुंबईला ‘आयपीएल’च्या सातव्या सत्रात विशेष चमक दाखविता आली नाही़ सचिन तेंडुलकरसारखा आयकॉन, अनिल कुंबळेसारखा मार्गदर्शक तसेच रिकी पाँटिंगसारख्या सल्लागाराने सजलेला हा संघ १० पैकी केवळ ३ सामन्यांत विजय मिळवू शकला आहे़ हा संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे़ मुंबईला जर प्ले-आॅफसाठी आपले आव्हान कायम राखायचे असेल, तर त्यांना पुढील चारही सामने जिंकावेच लागणार आहेत़ त्याचबरोबर प्ले-आॅफच्या चौथ्या स्थानासाठी इतर संघांचेही १४ गुण व्हावेत, अशी त्यांना प्रार्थना करावी लागणार आहे़ गतसामन्यात राजस्थानने सरदार पटेल स्टेडियमवर २०१ असा विशाल स्कोअर उभारला होता़ त्यानंतर दिल्लीला ६२ धावांनी धूळ चारली होती, तर मुंबईला आपल्या गत लढतीत कोलकाता नाईट रायडर्सकडून ६ गड्यांनी हार खावी लागली होती़ राजस्थानविरुद्धच्या लढतीत मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला, तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे़ मात्र, जर त्यांनी विजय मिळविला तर स्पर्धेतील चुरस कायम राहणार आहे़ मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीत राजस्थानला विजय मिळवायचा असेल तर फलंदाजीत कर्णधार शेन वॉटसन, स्टीव्हन स्मिथ, करुण नायर, अजिंक्य रहाणे यांना विशेष कामगिरी करावी लागणार आहे़ गोलंदाजीत त्यांना जेम्स फॉल्कनर, रजत भाटिया आणि प्रवीण तांबेकडून आशा असणार आहे़ तांबे याने स्पर्धेत आतापर्यंत १५ गडी बाद केले आहेत. सर्वाधिक विकेट मिळविणार्या खेळाडंूत तो चौथ्या क्रमांकावर आहे़ (वृत्तसंस्था)
राजस्थानचे लक्ष्य प्ले-आॅफ
By admin | Updated: May 19, 2014 04:31 IST