तिसऱ्या आणी अखेरच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताने न्यूझीलंडविरुद्ध एक दिवस राखून मोठ्या अंतराने बाजी मारली. कदाचित खेळपट्टीकडून फिरकी गोलंदाजांना अधिक मदत मिळाली. मात्र, तरीही रविचंद्रन आश्विनने केलेल्या उच्चस्तरीय फिरकी गोलंदाजीचे श्रेय कमी होत नाही. त्याने, रवींद्र जडेजासह न्यूझीलंड संघाला तंबूत धाडले. याच खेळपट्टीवर सकाळच्या सत्रामध्ये चेतेश्वर पुजारा आणि गौतम गंभीर यांनी ज्या प्रकारे मोकळेपणे फलंदाजी केली त्याने खूप प्रसन्न वाटले. आधी त्यांनी स्थिरावण्यास चांगला वेळ घेतला आणि खेळपट्टीचा योग्य अंदाज आल्यानंतर काही अप्रतिम फटके मारताना भारताला मजबूत स्थितीत आणले. कोहलीने पुजाराचे शतक होण्याची प्रतीक्षा केली. त्याने खूप वेळाने शतक झळकावले. किवींना दुसऱ्यांदा बाद करण्यासाठी आपल्याकडे बराच वेळ असल्याची जाणीव कोहलीला होती. शिवाय, खेळ इतका लवकर संपेल, याची खुद्द कोहलीलाही कल्पना नव्हती; परंतु आश्विनने फलंदाजांवर अधिक दबाव टाकून त्यांना फिरकीच्या जाळ्यात अडकवून पुन्हा एकदा सर्वाधिक बळी घेताना सामन्यात १३ बळी मिळविले. या वेळी त्याने आणखी एकदा मालिकावीर पुरस्कार मिळवताना सामनावीरचा किताबही पटकावला.पुजाराने मालिकेमध्ये चांगली फलंदाजी केली; पण या चांगल्या सुरुवातीचे प्रथम श्रेणीप्रमाणे शतकामध्ये रूपांतर करण्यात त्याला यश आले नाही. या वेळी त्याने कोणताही धोका न पत्करताना काही अप्रतिम फटके मारून शतक झळकावले. यामुळे आगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतसाठी त्याचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत मिळेल. गंभीरदेखील चांगला खेळला. त्यामुळे यापुढे सलामीवीरच्या निवडीसाठी निवडकर्त्यांची चांगली परीक्षा लागेल. कारण इंग्लंड मालिकेपर्यंत धवन आणि राहुल दोघेही दुखापतीतून सावरले असतील. जर किवी फलंदाजांनी पुजाराच्या फलंदाजीचा अभ्यास केला असता, तर त्यांनी भारताला टक्कर दिली असती. टॉम लॅथमने मालिकेच चमकदार फलंदाजी केली. परंतु, पुजाराप्रमाणेच तोही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याला पहिल्या डावात अर्धशतक झळकावण्याची संधी होती; पण उमेश यादवचा वेगवान मारा ‘अॅक्रॉस द लाईन’ खेळल्याचा फटका त्याला बसला आणि तो सहजपणे पायचीत झाला. विल्यम्सनदेखील काहीसा चाचपडताना दिसला. शिवाय, फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर तो आश्विनचा चार वेळा शिकार ठरला. आॅफ स्टम्पच्या अधिक बाहेर जाऊन खेळल्याने त्याने स्वत:लाच अडचणीत टाकले. त्यामुळे वळत असलेले चेंडू अधिक आतमध्ये आल्याने त्याने विकेट बहाल केली. गुप्टिलला काहीशी लय मिळाली होती; पण संघाचा पराभव टाळण्यात ते पुरेसे नाही ठरले. तर, इतर फलंदाज जणू काही मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळत असल्याचे भासले. आश्विनने केवळ संयमी फिरकी मारा करून त्यांना माघारी धाडले. मैदानात न्यूझीलंडने चांगली चिकाटी दाखविली; पण हीच चिकाटी त्यांनी फलंदाजीत दाखवली असती, तर त्यांचा धावफलक अधिक चांगला दिसला असता. (पीएमजी)
पुजारा, आश्विन यांचा चमकदार खेळ
By admin | Updated: October 12, 2016 07:12 IST