प्रो- कबड्डी लीगला उत्स्फूर्त प्रतिसाद!
By admin | Updated: August 21, 2014 22:10 IST
सुरजित नरवाल
प्रो- कबड्डी लीगला उत्स्फूर्त प्रतिसाद!
सुरजित नरवालप्रो- कबड्डी लीगला देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. कबड्डी आणि कबड्डीपटू दोहोंसाठी हे उत्तम लक्षण मानावे लागेल. मी हरियाणातील सोनिपत येथील निवासी आहे. या शहरातील माझ्या नातेवाईकांकडून समजले की, कबड्डीचा सामना सुरू असतो तेव्हा अख्खे सोनिपत टीव्हीपुढे खिळलेले असते. आमच्या शहरातील लोकांना साखळी सामना असो, मी त्या सामन्यात खेळत असू वा नसू याच्याशी देणेघेणे नाही. याशिवाय स्टेडियममध्ये उपस्थित लोकांची प्रतिक्रियादेखील खेळाडूंचा उत्साह वाढविणारी असते. इतक्या मोठ्या संख्येने स्टेडियममधील उपस्थिती पाहून आमचाही हुरूप वाढतो.माझा दबंग दिल्ली संघ शानदार आहे; पण आतापर्यंत आम्ही क्षमतेनुरूप खेळ केला नाही हे सत्य आहे. तेलगू टायटन्सकडून बसलेला पराभवाचा फटका आमच्यासाठी निराशादायी ठरला. ही लीग निर्णायक वळणावर आली असल्याने माझ्या संघाला उर्वरित तिन्ही सामन्यात विजय मिळविणे क्रमप्राप्त असेल. माझा फॉर्म उत्तम आहे. पण सांघिक कामगिरीच संघाला विजय मिळवून देते. संघासाठी अधिकाधिक सामने जिंकण्यात माझा फॉर्म निर्णायक ठरेल, अशी आशा आहे. कबड्डी हा भारताचा पुरातन खेळ असल्याने खूप आधी या खेळाला देशात लोकप्रियता मिळायला हवी होती; पण उशिरा का होईना ओळख आणि लोकप्रियता मिळत असल्याचा आनंद वाटतो. कबड्डी लीगचे आयोजन दरवर्षी होईल याबद्दल आनंदी आहे. महिला आणि पुरुष कबड्डी संघांनी आशियाडमध्ये अनेकदा देशाला सुवर्णपदके मिळवून दिली. वेळोवेळी या खेळाने देशाची शान उंचावली आणि पुढेही परंपरा सुरूच राहील, अशी आशा आहे.आमच्या फ्रॅन्चायजींकडून संंघाची संपूर्ण खबरदारी घेतली जात आहे. आमचे व्यवस्थापन चांगले आहे आणि कुशलतेने काम करते. सपोर्ट स्टाफ तितकाच उत्तम आहे. उत्कृष्ट सुविधा आणि सकारात्मक माहोल मिळाल्याने आगामी सामन्यात आमची कामगिरी क्षमतेनुरूप होईल, यात शंका नाही. आमचे कोच अनुभवी असल्याने सर्व खेळाडूंना विश्वासात घेत त्यांचा उत्साह द्विगुणित करतात. त्यांच्यासोबत काम करणे सोपे आहे. ते सर्वांना मित्रांसारखेे वागवतात. कोच हे कुठल्याही वेळी मित्रासारखे पाठीशी असतात. ही आमच्या जमेची बाजू ठरावी. याचा चांगला परिणाम सकारात्मक कामगिरीत होणार आहे.(टीसीएम) (लेखक हे दिल्ली दबंग संघाचे खेळाडू आहेत.)