मेलबोर्न : जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू सर्बियाचा नोव्हाक जोकोविच, नंबर वन महिला खेळाडू अमेरिकेची सेरेना विल्यम्स, गत चॅम्पियन स्वीत्झर्लंडचा स्टेनिसलास वावरिंका यांनी आॅस्ट्रेलियन ओपनमधील एकेरी सामन्यात विजयी धडाका कायम राखताना थाटात उपांत्य फेरीत प्रवेश केला़ मात्र, अमेरिकेची व्हीनस विल्यम्स आणि जपानचा केई निशिकोरी यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले़ किताबाचा प्रबळ दावेदार आणि अव्वल मानांकित जाकोविच याने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत आठवे मानांकन प्राप्त कॅनडाचा मिलोस राओनिकचा ७-६, ६-४, ६-२ असा पराभव करीत स्पर्धेत विजयी घोडदौड कायम राखली़ हा मुकाबला २ तास चालला़ सेमीफायनलमध्ये जोकोविचचा सामना आता गत विजेत्या स्टेनिसलास वावरिंका याच्याशी होणार आहे़वावरिंकाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पाचवे मानांकन प्राप्त जपानच्या केई निशिकोरी याचे आव्हान ६-३, ६-४, ७-६ गुणांनी संपुष्टात आणले. महिला गटात अव्वल मानांकनप्राप्त सेरेनाने स्लोव्हाकियाच्या डोमिनिका सिबुलकोव्हाला सरळ सेटमध्ये ६-२, ६-२ अशा फरकाने धूळ चारत अंतिम चार खेळाडूंत जागा निश्चित केली़ सेरेनाला सेमीफायनलमध्ये मॅडिसन किसचा सामना करावा लागेल़ विशेष म्हणजे मॅडिसन हिने सेरेनाची बहीण व्हीनस विल्यम्सवर अटीतटीच्या सामन्यात ६-३, ४-६, ६-४ अशा फरकाने विजय मिळवून उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित केला़ वावरिंकाने निशिकोरीविरुद्ध पहिले दोन सेट सहज जिंकत विजयाच्या दिशेने आगेकूच केली़ मात्र, तिसऱ्या सेटमध्ये त्याला निशीकोरीने चांगलीच झुंज दिली़ अखेर वावरिंकाने तिसरा सेट ८-६ ने टायब्रेकमध्ये जिंकत विजयी अभियान कायम राखले़ उपांत्य फेरीत व्हीनस जिंकली असती, तर तिचा सामना सेरेनाशी झाला असता़(वृत्तसंस्था)
पेस, सानिया उपांत्य फेरीत
By admin | Updated: January 29, 2015 03:13 IST