नवी दिल्ली : खराब सुरुवातीनंतर स्पर्धेत आपले आव्हान कायम राखणार्या कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर याने सध्या आपले लक्ष इंडियन प्रीमिअर लीगवर (आयपीएल) असल्याचे म्हटले आहे़ इंग्लंडचा आगामी दौरा किंवा २०१५ च्या वन-डे विश्वचषकाबद्दल सध्या कोणताही विचार करीत नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे़ गंभीरला आयपीएलमधील सुरुवातीच्या तीन सामन्यांत भोपळाही फोडता आला नव्हता़ मात्र, त्यानंतर सलग तीन अर्धशतके झळकावून त्याने टीकाकारांची तोंडे बंद केली़ गंभीर म्हणाला, की आयपीएलमधून भारतीय संघात पुनरागमन केले जाऊ शकत नाही़ मात्र, आयपीएल स्पर्धा काही प्रतिष्ठित स्पर्धांपैकी एक आहे़ या स्पर्धेत खेळायला आवडते़ या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याची इच्छा आहे़ भारताकडून ५४ कसोटी आणि १४७ वन-डे खेळणारा गंभीर पुढे म्हणाला, की सध्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये विशेष कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे़ यापुढेही मी चांगली कामगिरी करू शकलो, तर निवडकर्ते निश्चितच योग्य निर्णय घेतील, अशी आशा आहे़
सध्या लक्ष केवळ आयपीएलवर : गंभीर
By admin | Updated: May 16, 2014 05:32 IST