बंगलोर : ‘वीरझरा’ या चित्रपटातील शाहरूख खान व प्रीती झिंटा यांच्या मालकीचे संघ ‘आयपीएल’च्या सातव्या पर्वात जेतेपदासाठी झुंज देत असताना अखेर वीरने म्हणजेच शाहरूखच्या मालकीच्या ‘केकेआर’ने बाजी मारली. मनीष पांडेच्या (९४ धावा, ५० चेंडू, ७ चौकार, ६ षट्कार) दमदार खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने आज, रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा ३ गडी व ३ चेंडू राखून पराभव करीत आयपीएलच्या सातव्या पर्वात जेतेपदाचा मान मिळविला. पंजाब संघाचा यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाची शतकी खेळी अखेर व्यर्थच ठरली. दिग्गज खेळाडू अपयशी ठरत असताना विशेष चर्चेत नसलेल्या खेळाडूंनी केलेली चमकदार कामगिरी आयपीएलच्या सातव्या पर्वातील रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीचे ठळक वैशिष्ट्य ठरली. प्रीती झिंटाच्या मालकीच्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे आयपीएलमध्ये जेतेपद पटकाविण्याचे स्वप्न अखेर धुळीस मिळाले. २०१२ मध्ये प्रथमच विजेतेपद पटकाविणार्या केकेआर संघाने दुसर्यांदा जेतेपदाला गवसणी घातली. दिग्गज खेळाडूंच्या निराशाजक कामगिरीनंतरही रिद्धामान साहा (नाबाद ११५) व मनन व्होरा (६७) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने ४ बाद १९९ धावांची दमदार मजल मारली. शाहरूखच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने विजयासाठी आवश्यक धावा १९.३ षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मनीष पांडेने अर्धशतकी खेळी करीत केकेआर संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला युसूफ पठाण (३६ धावा, २२ चेंडू, ४ षट्कार), कर्णधार गौतम गंभीर (२३ धावा, १७ चेंडू, ३ चौकार) व पीयूष चावला (नाबाद १३, ५ चेंडू, १ चौकार, १ षट्कार) यांची योग्य साथ लाभली. पंजाब संघातर्फे सर्वाधिक यशस्वी गोलंदाज करणवीर सिंगने ४ बळी घेतले; पण त्यासाठी त्याला ५४ धावांचे मोल द्यावे लागले. जॉन्सनने ४१ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. त्याआधी, रिद्धिमान साहाची नाबाद शतकी खेळी व त्याने मनन व्होरासोबत तिसर्या विकेटसाठी ७२ चेंडूंमध्ये केलेल्या १२९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने ४ बाद १९९ धावांची मजल मारली. साहाने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना ५५ चेंडूंमध्ये नाबाद ११५ धावा फटकाविल्या. त्यात १० चौकार व ८ षट्कारांचा समावेश आहे. पंजाब संघाची २ बाद ३० अशी नाजूक अवस्था असताना साहाने व्होराच्या साथीने शतकी भागीदारी करीत डाव सावरला. व्होराने ५२ चेंडूमध्ये ६ चौकारांच्या साहाय्याने ६७ धावांची खेळी केली. साहाने केकेआर संघाचा हुकमी एक्का सुनील नरेनच्या गोलंदाजीचा विशेष समाचार घेतला. नरेनच्या ४ षटकांत ४६ धावा फटकाविल्या गेल्या. त्यांपैकी ३५ धावा एकट्या साहाने वसूल केल्या. या यष्टिरक्षक फलंदाजाने लेगस्पिनर पीयूष चावला (२-४४) आणि उमेश यादव (१-३९) यांच्या गोलंदाजीवरही धावा वसूल केल्या. किंग्ज इलेव्हन संघाचे दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवाग (७), कर्णधार जॉर्ज बेली (१), ग्लेन मॅक्सवेल (०) आणि डेव्हिड मिलर (नाबाद ०१) यांना आज विशेष छाप सोडता आली नाही. (वृत्तसंस्था)
फिर एक बार ‘केकेआर’
By admin | Updated: June 2, 2014 06:49 IST