ब्रिजटाऊन : न्यूझीलंडने तिसऱ्या आणि निर्णायक कसोटीत अखेरच्या दिवशी वेस्ट इंडीजचा दुसरा डाव २५४ धावांत गुंडाळून सामन्यात ५३ धावांनी शानदार विजय मिळविला़ या विजयासह न्यूझीलंडने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ असे वर्चस्व राखले़ न्यूझीलंडने दिलेल्या ३०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडीज संघ ८२़२ षटकांत २५४ धावांत तंबूत परतला़ त्याआधी जमैका येथे झालेल्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडने बाजी मारली होती़ मात्र, दुसऱ्या लढतीत वेस्ट इंडीजने सरशी साधून मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळविली होती़ मात्र, तिसऱ्या कसोटीत विंडीजवर पराभवाची नामुष्की ओढावली़ २००२नंतर न्यूझीलंडने विंडीजमध्ये पहिल्यांदाच कसोटी मालिका आपल्या नावे केली आहे़ सामन्याच्या अखेरच्या दिवशी १३़४ षटके शिल्लक असताना न्यूझीलंडने सामन्यावर नाव कोरले़ मॅक्युलमच्या संघाने न्यूझीलंडमध्ये झालेल्या मालिकेत विंडीजवर २-०ने आणि त्यानंतर भारताविरुद्ध १-०ने विजय मिळविला होता़ न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात नाबाद १६१ धावांची खेळी करणाऱ्या केन विल्यम्सनला सामनावीर पुरस्काराचा मान मिळाला़ त्याआधी ३०८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या विंडीजची सुरुवात निराशाजनक झाली़ त्यांचा सलामीवीर फलंदाज ख्रिस गेल (११), क्रेग ब्रेथवेट (६), के़ एडवर्ड्स (१०), शिवनारायण चंद्रपॉल (२५) हे लवकरच तंबूत परतले़ मात्र, यानंतर डॅरेन ब्राव्हो (४०), कर्णधार दिनेश रामदीन (२९) आणि जेसन होल्डर याने ५१ धावा करीत डाव सावरला; परंतु त्यांना संघाचा पराभव टाळता आला नाही़ (वृत्तसंस्था)
न्यूझीलंडचा मालिकेवर कब्जा
By admin | Updated: July 2, 2014 03:05 IST