लंडन : जागतिक टेनिसवर दबदबा असलेल्या स्पेनच्या राफेल नदालला मंगळवारी १९ वर्षीय निक किर्गिओसने विम्बल्डनच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जोरदार धक्का दिला. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना निकने केलेल्या अप्रतिम खेळाचे कोणतेही उत्तर नदालकडे नव्हते. त्याचा प्रत्येक वार नदालला हतबल करत होता आणि हे इतक्या वर्षांत क्वचितच नदालच्या बाबतीत घडताना कुणी पाहिले असेल. निकने ही लढत ७-६ (७-५), ५-७, ७-६ (७-५), ६-३ अशी जिंकली. पहिल्या सेटपासूनच या दोन्ही खेळाडूंमधील चढाओढ प्रेक्षकांनी अनुभवली. हलक्याशा सरींनी वातावरणात आलेला गारवा या लढतीने नाहीसा केला. दोन्ही खेळाडूंची सडेतोड उत्तर देण्याची क्षमता वातावरणात गांभीर्य निर्माण करून गेला. निकने टायब्रेकरमध्ये रंगलेला पहिला सेट ४८ मिनिटात ७-६ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र नदालने जबरदस्त कमबॅक केले आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. परंतु, तिसरा सेट पुन्हा टायबे्रकरमध्ये ताणला आणि पुन्हा निकने बाजी मारली. चौथ्या आणि निर्णायक सेटमध्ये नदाल मुसंडी मारेल अशी अपेक्षा होती, पण निकच्या वाढलेल्या आत्मविश्वासाने ती विरली. (वृत्तसंस्था)
निकचा नदालला धक्का
By admin | Updated: July 2, 2014 05:07 IST