मुंबई : आयपीएल संचलन परिषदेच्या सर्व अटी मान्य करण्याची तयारी दाखवूनही यंदाची फायनल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार नाही, हे अखेर स्पष्ट झाले. संचलन परिषदेने मुंबईला ठेंगा दाखवत आयपीएल-७ची फायनल बंगलोरमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर घेण्याचा पूर्वीचा निर्णय कायम ठेवला. काल, शनिवारी रात्री संचालन परिषदेच्या सदस्यांनी दीर्घ चर्चा करून अंतिम लढत बंगलोरमध्येच खेळवण्याचा निर्णय बदलण्याची आवश्यकता नसल्याचा निष्कर्ष काढला. ‘मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) मागणीवर संचलन परिषदेच्या सर्व सदस्यांनी विचार केला. मात्र, आयपीएलच्या सातव्या मोसमाची फायनल बंगलोरमध्येच खेळवण्यात यावी, याबाबत परिषदेने सर्वसंमतीने निर्णय घेतला. मुंबईने सर्व अटी मानण्याची तयारी दर्शवली असली तरी सोमवार वा मंगळवारपर्यंत थांबण्याइतपत वेळ आमच्याकडे नाही, हेदेखील अंतिम लढत वानखेडे स्टेडियमवर न खेळवण्याचे एक कारण आहे,’ असे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले. आपल्या पूर्वीच्या निर्णयांबाबत लवचिक भूमिका घेत संचलन परिषदेच्या सर्व १४ अटी मान्य करण्याची तयारी दर्शवूनही अखेर एमसीएच्या पदरी निराशाच आली. १ जूनला ही फायनल होणार आहे. त्याआधी मुंबई इंडियन्सला २३ व २५ मे रोजी वानखेडे स्टेडियमवर सामने खेळायचे आहेत. शिवाय ३० मे रोजी दुसरी क्वालिफायर लढत याच मैदानावर होईल. २८ मे रोजी होणारी एलिमिनेटर लढत मुंबईमधील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होत आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
मुंबईला ठेंगा... फायनल बंगलोरमध्येच !
By admin | Updated: May 19, 2014 04:30 IST