औरंगाबाद : पाचव्या मदर टेरेसा आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र पब्लिक स्कूल आणि सेंट फ्रान्सिस संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली.सेंट फ्रान्सिसच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या लढतीत महाराष्ट्र पब्लिक स्कूलने न्यू इंग्लिश स्कूलविरुद्ध १५ षटकांत ७ बाद ११३ धावा केल्या. त्यांच्यातर्फे कुणाल पाराशरने ३८, शुभम् राजपूतने २५ धावा केल्या. या धावसंख्येत २७ अवांतर धावांचीही भर पडली. न्यू इंग्लिश स्कूलतर्फे वरद देवकर व विपुल हिवरडकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात न्यू इंग्लिश स्कूल संघ ७ बाद ६३ या धावसंख्येपर्यंतच मजल मारू शकला. त्यांच्याकडून एकही फलंदाज दुहेरी आकडी धावसंख्या पार करू शकला नाही. महाराष्ट्र पब्लिक स्कूलने २६ धावा या अवांतर रूपात दिल्या. त्यांच्याकडून शुभम् राजपूतने ३ आणि सूरज भावरे व राज झामगे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. महाराष्ट्र पब्लिक स्कूलने हा सामना ५0 धावांनी जिंकला.दुसर्या सामन्यात सेंट फ्रान्सिसने एमआयटी संघाविरुद्ध ४ बाद ११७ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून श्रेय शिटे याने नाबाद ४६ आणि अजय चापेकरने नाबाद २९ धावा केल्या. एमआयटी संघाकडून आकाश लोखंडेने २, तर अक्षय सोनटक्के व ऋषीपाल सुरडकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात एमआयटी संघ ६ बाद ४३ धावा करू शकला. उद्या, शनिवारी ९ वाजता सरस्वती भुवन वि. राजा शिवाजी विद्यालय आणि दुपारी १२ वाजता संत मीरा मराठी विरुद्ध किडस् किंगडम यांच्यात सामने होणार असल्याचे स्पर्धा सचिव निकोलस ॲन्थोनी यांनी कळवले आहे.
महाराष्ट्र पब्लिक स्कूल, सेंट फ्रान्सिस विजयी
By admin | Updated: August 3, 2014 00:53 IST