बंगळुरु : चमकदार कामगिरीच्या जोरावर सलग दुसऱ्यांदा रणजी विजेतेपद पटकावल्यानंतर, आता बलाढ्य कर्नाटक संघ सलग दुसऱ्यांदा इराणी ट्रॉफीवर कब्जा करण्यासाठी शेष भारत विरुध्द दोन हात करेल. मात्र कर्नाटकच्या या मोहिमेला जबर धक्का बसला आहे. अव्वल फलंदाज लोकेश राहूल स्नायूच्या दुखापतीने बेजार असल्याने तो खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गतवर्षी कर्नाटकने शेष भारताचा एक डाव राखून दणदणीत पराभव केला होता. याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार कर्णधार विनय कुमारने केला आहे. ५ सामन्यांतून ९३.११च्या शानदार सरासरीने कर्नाटकडून ८३८ धावा चोपणारा राहूल या सामन्यात खेळणार नसल्याने त्याची कमी कर्नाटकला नक्कीच भासेल. याविषयी विनय कुमारने सांगितले की, राहूल आमचा महत्त्वाचा फलंदाज असून त्याची कमी भासेल. अशा परिस्थितीत अभिषेक रेड्डी पदार्पण करेल. दुसऱ्या बाजूला यंदाच्या रणजी मोसमात फारसा प्रभाव न पाडलेल्या मनोज तिवारीकडे शेष भारताची धुरा सोपविण्यात आली असून या सामन्यात सगळी कसर भरुन काढण्याचा त्याचा प्रयत्न असेल. तसेच केदार जाधव, उन्मुक्त चंद, जीवनज्योत सिंग आणि नमन ओझा यांच्यावर देखील शेष भारताची फलंदाजी अवलंबून असेल. विशेष म्हणजे मुंबईचा यशस्वी गोलंदाज शार्दुल ठाकूरकडे शेष भारताच्या गोलंदाजीची धूरा असेल. शार्दुलने यंदाच्या मोसमात शानदार कामगिरी करताना संयुक्तरीत्या सर्वाधिक ४८ बळी घेतले आहेत. विनय कुमारने देखील ४८ बळी घेतले असल्याने दोन्ही संघांची गोलंदाजी तुल्यबळ दिसत आहे. तरी, यंदाचा शेष भारत संघ हा नवखा व युवा खेळाडूंचा असून प्रतिस्पर्धी कर्नाटक पुर्ण जोषात असून त्यांनाच विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. (वृत्तसंस्था)असे असतील संघ : कर्नाटक : विनय कुमार (कर्णधार), मनिष पांड्ये, रॉबीन उथप्पा, आर. समर्थ, करुण नायर, श्रेयश गोपाल, कुणाल कपूर, उदीत पटेल, ए. मिथून, एस. अरविंद, एच सरथ, जे. सुचित, शिशीर भावने, केसी अविनाश, अभिषेक रेड्डी. शेष भारत: मनोज तिवारी (कर्णधार), उन्मुक्त चंद, जीवनज्योत सिंग, पारस डोग्रा, केदार जाधव, नमन ओझा, रिषी धवन, जयंत यादव, प्रग्यान ओझा, शार्दुल ठाकूर, वरुण अॅरोन, रुष कलारीया, बाबा अपराजीत, जलज सक्सेना, विजय शंकर.
कर्नाटक विजेतेपद राखणार?
By admin | Updated: March 17, 2015 01:01 IST