नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने बॅडमिंटनची दुहेरी जोडी ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांचा टार्गेट आॅलिम्पिक पोडियम अर्थात टॉप योजनेतील समावेशाला तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यासोबतच राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांचे समर्थन केले आहे. गोपीचंद यांच्यावर या दोघींनी पक्षपात केल्याचा आरोप केला होता. तसेच या जोडीच्या मागणीमुळेच एकेरीप्रमाणेच दुहेरीत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनादेखील खास प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यास मंत्रालयाने मान्यता दिली आहे. क्रीडा मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला असून, ज्वाला आणि अश्विनी यांचा समावेश टॉपच्या पुढच्या यादीत केला जाईल, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.संबंधित अधिकारी म्हणाले, ‘‘मंत्रालयाने बॅडमिंटन दुहेरीत प्रशिक्षकाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आम्ही बॅडमिंटनच्या या आघाडीच्या जोडीला टॉप योजनेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ज्वाला आणि अश्विनी यांच्याशिवाय सरस जोडी नाही आणि त्यांना लवकरच आॅलिम्पिकच्या टॉप खेळाडूंमध्ये सहभागी करून घेतले जाईल.’’काही दिवसांपूर्वी अश्विनी पोनप्पानेही ज्वालाचीच री ओढली होती. त्यात टॉप समावेशावरून मंत्रालय व प्रशिक्षक गोपीचंद यांच्यावर तिने टीका केली होती.या अधिकाऱ्याने सांगितले, की या दोन्ही खेळाडूंनी आरोप केले ते न करताही त्यांचा समावेश या योजनेत होऊ शकला असता. तसेच ज्वाला आणि अश्विनी यांनी गोपीचंद यांच्यावर केलेले आरोप तथ्यहीन आहेत. तसे करणे चुकीचे आहे.हा अधिकारी म्हणाला, की या दोघींनी गोपीचंद यांच्याविरोधात बोलणे चुकीचे आहे. टॉपच्या कोणत्याही बैठकीत गोपीचंद यांनी ज्वाला आणि अश्विनी यांच्याविरोधात वक्तव्य केलेले नाही. तसेच, त्यांच्या प्रयत्नांमुळेच दुहेरीत प्रशिक्षकाच्या नियुक्तीला मंत्रालय तयार झाले आहे. दुहेरी जोडीला आर्थिक साह्य इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीने दिलेल्या १० कोटी रुपयांतून केले जाणार आहे. सायना नेहवालसह, पी. कश्यप, के. श्रीकांत, एच. एस. प्रणय, आर. एम. व्ही. गुरुसाईदत्त, पी. व्ही. सिंधू सहभागी झाले आहेत.
ज्वाला व अश्विनी ‘टॉप’च
By admin | Updated: July 11, 2015 01:38 IST