नवी दिल्ली : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) खेळातील भ्रष्टाचार तसेच फिक्सिंगला आळा घालण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जावेद सिराज यांची इंटेग्रिटी आॅफिसरपदी नियुक्ती केली. ते १ आॅगस्टपासून कार्यभार स्वीकारतील. एआयएफएफचे महासचिव कुशाल दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, एआयएफएफने फुटबॉलमधील फेअर प्ले, योग्यतेच्या आधारे सन्मान, सामने आणि स्पर्धेच्या निकालाची अनिश्चितता कायम ठेवण्यावर ध्यान केंद्रित केले आहे. मॅच फिक्सिंग खेळासाठी मोठा धोका असल्याने एआयएफएफने फुटबॉलमध्ये सुशासन कायम राखण्यावर भर दिला आहे. एआयएफएफ खेळाचे पावित्र्य कायम राखण्यासाठी कटिबद्ध असल्याने इंटेग्रिटी आॅफिसर संपर्कात राहील, शिवाय डावपेचदेखील तयार करेल.तांत्रिक समितीची बैठक आज२०१७च्या १७ वर्षे गटाच्या युवा फुटबॉल विश्वचषकाच्या आयोजनाची तयारी म्हणून एआयएफएफने तीन सदस्यांची तांत्रिक समिती स्थापन केली आहे. या समितीत माजी खेळाडू बायचुंग भुतिया, सुनील छेत्री आणि साळगावकर एफसीचे कोच डेरेक परेरा यांचा समावेश आहे. महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या या समितीची पहिली बैठक उद्या (श्निवारी) बंगळुरू येथे होईल. या बैठकीला तिघांशिवाय एआयएफएफचे तांत्रिक संचालक रॉबर्ट बान, राष्ट्रीय कोच टीम कोवरमेन्स आणि महासचिव कुशाल दास उपस्थित राहतील. विश्वचषकात खेळणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंची शोधमोहीम आणि विकास यावर तसेच आवश्यक बाबींवर रोडमॅप तयार करण्यात येत असून, त्यावर चर्चा केली जाईल. याशिवाय, १५ वर्षे गटाची संभाव्य युवा लीग कशी आयोजित करायची, यावरही चर्चा होईल. (वृत्तसंस्था)
जावेद सिराज ‘इंटेग्रिटी आॅफिसर’पदी नियुक्त
By admin | Updated: July 19, 2014 02:07 IST