ऑनलाइन टीम
फोर्टालेजा, दि. २५ - आयव्हरी कोस्ट विरूध्द ग्रीस यांच्यात मंगळवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात ग्रीसने इतिहास रचला. आयव्हरी कोस्ट संघाचा २-१ असा पराभव करीत ग्रीसच्या संघाने पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम १६ मध्ये स्थान पटकावून बाद फेरीत प्रवेश मिळवला.
दुस-या एका सामन्यात जपान विरूध्द कोलंबिया यांच्यात झालेल्या सामन्यात कोलंबिया संघाने जपानला ४-१ अशी धूळ चारली. ग्रीसकडून ४२व्या मिनिटाला सॅमरीसने गोल करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. परंतू ७४ व्या मिनिटाला आयव्हरी कोस्टच्या बोनी वेलफ्रायडने गोल करीत संघाला बरोबरीत आणून सोडले. ग्रीसला हा सामना जिंकणे गरजेचे होते. आयव्हरी कोस्टने हा सामना बरोबरीत जरी सोडवला असता तरी हा संघ अंतिम १६ मध्ये आपली जागा पटकावणार होता पण शेवटच्या ९० व्या मिनिटाला ग्रीसच्या सॅमारसने गोल करीत संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान, जपान विरूध्द कोलंबिया यांच्यातील सामन्यात कोलंबियाच्या खेळाडूने सुरूवातीपासूनच आक्रमकपणा दाखवला. कोलंबियाच्या क्वॉड्रोडोने १७ व्या मिनिटाला गोल करीत संघाला पहिला गोल मिळवून दिला. त्यानंतर जपानच्या ओकोझॅकीने ४५ व्या मिनिटाला गोल करीत संघाला बरोबरीत आणले. कोलंबियाच्या जॅक्सनने आक्रमकपणे ५५ आणि ८२ मिनिटाला गोल करीत संघाला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली तर ९० व्या मिनिटाला जेम्सने गोल करीत कोलंबिया संघाला विजय मिळवून दिला.