ग्लास्गो : भारतीय हॉकी संघ विश्व चॅम्पियन व गतविजेत्या आॅस्ट्रेलियाचे आव्हान मोडून काढण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरला. ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुष हॉकीच्या अंतिम लढतीत भारताला आॅस्ट्रेलियाविरुद्ध ०-४ ने पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे भारताचे या स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविण्याचे स्वप्न भंगले. भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चार वर्षांपूर्वी दिल्ली राष्ट्रकुलमध्ये अंतिम लढतीत भारताला आॅस्ट्रेलियाविरुद्ध ०-८ ने पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी पराभवातील अंतर कमी असले तरी भारत आॅस्ट्रेलियाचे आव्हान मोडून काढण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरल्याचे सिद्ध झाले. आॅस्ट्रेलियाने दोन्ही सत्रांत दोन-दोन गोलची नोंद करीत सुवर्णपदक पटकाविले. भारताने अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५-२ ने पराभव केला होता; तर उपांत्य फेरीत न्यूझीलंडची झुंज ३-२ ने मोडून काढली होती. त्यामुळे अंतिम लढतीत भारतीय संघ आॅस्ट्रेलियाला कडवी झुंज देईल, अशी अपेक्षा होती. कर्णधार सरदार सिंगला निलंबनाच्या कारवाईमुळे उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये सहभागी होता आले नव्हते. सरदार सिंग आज संघात परतला होता; पण विश्व चॅम्पियन आॅस्ट्रेलियाचे वर्चस्व मोडून काढण्यात भारत सपशेल अपयशी ठरला. आॅस्ट्रेलियाचा पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट ख्रिस सिरिएलोने १३, २९ व ४८ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवीत हॅट््ट्रिक पूर्ण करीत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. (वृत्तसंस्था)
सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले
By admin | Updated: August 4, 2014 03:02 IST