अल्जेरियाला २-१ ने नमवित उपांत्यपूर्व फेरीत धडक
ऑनलाइन टीम
पाटो-एलग्रे, दि. १ - अल्जेरिया विरूध्द झालेल्या सामन्यात एक्स्ट्रा टायमिंगमध्ये जर्मनीने अल्जेरियाचा २-१ असा पराभव केला. या विजयाबरोबरच तिनदा विश्वचषकाचा ताज भूषविणा-या जर्मनीने यंदाही आपण प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले.
जर्मनी विरूध्द अल्जेरिया यांच्यात सोमवारी दीड वाजता सुरू झालेला हा सामना जवळपास साडेचार वाजेपर्यंत चालला. सामन्याच्या पहिल्या आणि सेंकड हाफमध्ये दोन्ही संघातील खेळाडूंना गोल करण्यात अपयश आले. सामन्याची वेळ संपल्यानंतर मिळालेल्या 'एक्स्ट्रा टाईम' मध्ये जर्मनीच्या शुर्ले याने ९२ व्या मिनिटाला गोल करीत संघाला १-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर १२० व्या मिनिटाला जर्मनीच्या मेसट ओझीलने गोल करीत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. पण ही आघाडी फार काळ टीकू शकली नाही कारण त्याच्या दुस-याच मिनिटाला अल्जेरियाच्या जाबौने गोल केला. परंतू त्यानंतर सामन्याची वेळ संपल्याने जर्मनीने हा सामना २-१ असा जिंकला. या विजयाबरोबरच जर्मनीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जर्मनीने या आधी १९५४, १९७४ आणि १९९० साली विश्वविजेतेपद पटकावले होते. जर्मनीचा संघ यंदाही विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.