रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणासाठी केंद्र सरकारकडून ५ हजार कोटी रुपये दिले जातील, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग, नौकानयन व ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात केली.कोकण किनारपट्टीवरील ८ मोठी बंदरे औद्योगिक तसेच पर्यटन विकासासाठी रेल्वेने जोडली जातील. त्यासाठी कोकणवासीयांनी संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. संगमेश्वर तालुक्यातील वांद्री गावातील सप्तलिंगी पुलाजवळ महामार्ग चौपदरीकरणातील १२ पूल व रेल्वेमार्गावरील २ उड्डाणपुलांचे त्यांनी प्रातिनिधिक भूमिपूजन केले.गडकरी म्हणाले की, इंदापूर ते झाराप या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण डांबरीऐवजी सिमेंट काँक्रिटचे केले जाणार आहे. जमिनीचे संपादन करताना योग्य मोबदला दिला जाईल. भूसंपादनासाठी १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पुलांसह रस्त्याचे काम २ वर्षांत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. खासगी तत्त्वावर काम करण्यास दिलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या ८४ किलोमीटर रस्त्याचे ३० टक्केही काम झाले नसल्याचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी सांगितले. कोकणात स्मार्ट सीटी उभी करण्याची मागणी विरोधी विनोद तावडे यांनी केली. (प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गासाठी पाच हजार कोटी
By admin | Updated: August 26, 2014 03:13 IST