ऑनलाइन टीम
साओ पाउलो, दि. १०- पेनल्टी शूटआऊटमध्ये गोलकिपर रोमेरोच्या उत्कृष्ट बचावामुळे तब्बल २४ वर्षांनी अर्जेंटिनाने फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक दिली. पेनल्टी शूटआऊटमध्ये नेदरलँडचा ४-२ ने पराभव करत मेस्सीच्या अर्जेंटिनाने फायनलमध्ये प्रवेश केला असून फायनलमध्ये त्यांचा सामना बलाढ्य जर्मनीशी होणार आहे.
फिफा विश्वचषकाच्या दुस-या सेमीफायनलमध्ये अर्जेंटिना विरुद्ध नेदरलँड यांच्यात लढत झाली. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या ऑरेंज आर्मीशी मेस्सी ब्रिगेडची झूंज असल्याने हा सामना रंगतदार होणार अशी अपेक्षा होती. दोन्ही संघांनी अपेक्षेप्रमाणे एकमेकांना काटे की टक्कर दिली. पहिल्या भागात दोन्ही संघांनी एकमेकांना गोलपोस्टपासून दूरच ठेवले होते. १५ व्या मिनीटाला अर्जेंटिनाच्या मेस्सीने मारलेली जबरदस्त किक नेदरलँडचा गोलकिपर सिल्लेसेने रोखली. तर नेदरलँडलाही अर्जेंटिनाची बचाव फळी भेदताच येत नव्हती. नेदरलँडचा स्ट्रायकर अर्जेन रॉबेलकडे चेंडू येताच अर्जेंटिनाचे दोन ते तीन खेळाडू त्याच्या भोवती दिसायचे. तर अर्जेंटिनाच्या मेस्सीलाही नेदरलँडने अशाच पद्धतीने लॉक केले.
दुस-या हाफमध्ये नेदरलँड आणि अर्जेंटिना दोन्ही संघांनी आक्रमकपणे खेळ करुन एकमेकांच्या गोलपोस्टच्या दिशेने हल्लाबोल केला. सामन्याच्या शेवटच्या १५ मिनीटांमध्ये अर्जेंटिनाने गोल करण्यात यश मिळवले खरे मात्र ऑफसाइडमुळे हा गोल अपात्र ठरवण्यात आला. शेवटच्या मिनीटाला नेदरलँडच्या आघाडीवर अर्जेन रॉबेनला गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र अर्जेंटिनाच्या बचाव फळीमुळे रॉबेनला गोल करण्यात अपयश आले.
९० मिनीटांमध्ये दोन्ही संघांना गोल मारण्यात अपयश आल्याने अतिरिक्त अर्धा तासाचा वेळ देण्यात आला. मात्र यातही दोन्ही संघांनी गोल केला नाही. शेवटी पेनल्टी शूटद्वारे सामन्याचा निकाल ठरला.
पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाचा गोलकिपर रोमेरोने उत्कृष्ट बचाव करत संघाला अंतिम सामन्यात नेले. रोमेरोने नेदरलँडच्या व्लार आणि वेसली स्नायडर या दोघांनी मारलेल्या किकवर उत्कृष्ट बचाव करत अर्जेंटिनाला विजयी आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिनाच्या मेस्सीने संघाला पहिल्याच किकमध्ये यश मिळवून दिले. यानंतर अर्जेंटिनाच्या मॅक्सी रॉड्रीग्जने चौथी आणि निर्णायक किकवर गोल मारुन रोमेरोने रचलेल्या पायावर कळस ठेवला. पेनल्टी शूट आऊटमध्ये नेदरलँडला फक्त दोनच गोल करता आले. तर अर्जेंटिनाने चारही किकवर गोल मारल्याने नेदरलँडचा ४-२ ने पराभव झाला.
सामन्याची वैशिष्ट्ये
> अर्जेंटिनाचा स्टार फूटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा हा ९२ वा आंतरराष्ट्रीय सामना होता. अर्जेंटिनाचे दिग्गज फूटबॉलपटू दिएगो मॅराडोना हे ९१ आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते.
> सेमीफायनलच्या सामन्यात एकही गोल न होण्याची ही पहिलीच वेळ होती.
> १६ वर्षानंतर विश्वचषकाच्या सेमीफायनलचा निकाल पेनल्टी शूटआऊटद्वारे लागला. यापूर्वी १९९८च्या विश्वचषकात नेदरलँड विरुद्ध ब्राझील सामन्याचा निकाल शूटआऊटद्वारे लागला होता.
> यंदाच्या विश्वचषकात अतिरिक्त वेळ देण्यात आलेला हा सातवा सामना आहे. यापूर्वी १९९० च्या विश्वचषकात ८ सामन्यांमध्ये अतिरिक्त वेळ देण्यात आला होता.
> जर्मनीच्या शेजारी राष्ट्राला ब्राझीलच्या शेजारी राष्ट्राने हरवले.
> विश्वचषकात सामन्यातील अतिरिक्त वेळेत अर्जेंटिनाने प्रतिस्पर्धी संघांना गोल करु दिलेला नाही. तर नेदरलँडने अतिरिक्त वेळेत कधीच गोल केले नव्हते. दोन्ही संघांनी त्यांचा हा रेकॉर्ड कायम ठेवला.
> अतिरिक्त वेळेत पर्सी ऐवजी बदली खेळाडू पाठवण्याची प्रशिक्षक वान गाल यांची शक्कल संघांसाठी उपयुक्त ठरली नाही. अतिरिक्त वेळेत पर्सीऐवजी बदली खेळाडू पाठवल्याने नेदरलँडना पेनल्टी शूटआऊटमध्ये गोलकिपर बदलता आला नाही. याच विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरीत कोस्टारिका विरुद्धच्या लढतीत पेनल्टी शूटआऊटमध्ये टीम क्रूल या बदली गोलकिपरने दोन सेव्ह करुन संघाला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे ऐन मोकाच्या क्षणी क्रूलची अनुपस्थिती संघाला भोवली.
फायनलमध्ये अर्जेंटिनासमोर आव्हान बलाढ्य जर्मनीचे
तब्बल २४ वर्षांनी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचलेल्या अर्जेंटिनाची लढत जर्मनीशी होणार आहे. सेमीफायनलमध्ये यजमान ब्राझीलचा ७-१ ने धूव्वा उडवत फायनलमध्ये दाखल झालेल्या जर्मनीचा आत्मविश्वास दुणावला आहे. तर अर्जेंटिनानेही यंदाच्या वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी ठसा उमटवला आहे. फिफा विश्वचषकात हे दोन्ही संघ २०१० मधील उपांत्यपूर्व फेरीत आमनेसामने आले होेते. यात जर्मनीने अर्जेंटिनावर ४-० ने मात केली होती. तर आत्तापर्यंत ८ वेळा हे संघ एकमेकांना भिडले आहेत. यात ४ वेळ विजय मिळवणा-या अर्जेंटिनाचे पारडे जड आहे. तर जर्मनीला फक्त एक विजय मिळाला आहे.