नवी दिल्ली : सलग तीन सामन्यांत पराभव स्वीकारणार्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला आयपीएलच्या सातव्या पर्वात प्लेआॅफसाठी पात्रता मिळविण्याची आशा कायम राखण्यासाठी शनिवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध खेळल्या जाणार्या लढतीसह उर्वरित सर्व सामन्यांत विजय मिळविणे आवश्यक आहे. डेअरडेव्हिल्स संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर असून, चमत्कार घडला, तरच या संघाला टी-२० स्पर्धेत बाद फेरीत स्थान मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली संघाचे मनोधैर्य खचलेले असून, संघाचे नशीब पालटण्यासाठी त्यांना विशेष कामगिरी करावी लागणार आहे. कर्णधार केव्हिन पीटरसनचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय आहे. पीटरसनला पाच डावांमध्ये केवळ ६२ धावा फटकाविता आल्या. दुसर्या बाजूचा विचार करता सनरायजर्स हैदराबाद संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. भुवनेश्वर कुमार, डेल स्टेन, कर्ण शर्मा, हेन्रिक्स व इरफान पठाण हे गोलंदाज आहेत. कर्णधार शिखर धवनकडून संघाला चमकदार सुरुवात अपेक्षित आहे. डेव्हिड वॉर्नर व अष्टपैलू डॅरेन सॅमी यांच्याकडून संघाला मोठ्या खेळीची आशा आहे. (वृत्तसंस्था)
दिल्लीला हैद्राबादविरुद्ध विजय आवश्यक
By admin | Updated: May 10, 2014 00:44 IST