कोल्हापूर : ‘केएसए’ लीग फुटबॉल स्पर्धेतील आज, बुधवारी झालेल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला, तर दुसऱ्या सामन्यात साईनाथ स्पोर्टस्ने पॅट्रियट स्पोर्टस्ला १-१ असे बरोबरीत रोखले. छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या ‘केएसए’ लीग फुटबॉल स्पर्धेतील दुपारच्या सत्रातील पहिला सामना खंडोबा विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ यांच्यात झाला. सामन्याच्या सुरुवातीलाच खंडोबाच्या शशांक अश्वेकरने मोठ्या डी बाहेरून मारलेला फटका ‘शिवाजी’चा गोलरक्षक गुरुदेव बलबिरसिंग याने अडवला. उत्तरार्धात दोन्ही संघांकडून सामन्यात विजयी होण्यासाठी गोल करण्याचे आटोकाट प्रयत्न झाले. मात्र, दोन्ही बाजूंनी ते परतावून लावले जात होते. सामन्याच्या शेवटच्या पंधरा मिनिटांत दोन्ही संघांनी आक्रमण प्रतिआक्रमणास प्रारंभ केला. शिवाजीकडून सागर भातकांडेने गोल करण्याचा प्रयत्न केला. ‘शिवाजी’कडून स्वप्निल पाटील, सूरज शेळके, मंगेश भालकर यांनी, तर ‘खंडोबा’कडून शेवटच्या क्षणापर्यंत सुमित जाधव, अर्जुन शितगावकर, श्रीधर परब यांनी गोल करण्याचे प्रयत्न केले. अखेरपर्यंत दोन्ही संघांना गोल करण्यात यश आले नाही. दुसरा सामना साईनाथ स्पोर्टस् विरुद्ध पॅट्रियट स्पोर्टस् यांच्यात झाला. सामन्याच्या प्रारंभापासून दोन्ही संघांनी बचावात्मक पवित्रा घेतला. ‘साईनाथ’ कडून अनिकेत सरनाईक, अजिंक्य श्ािंदे, हृषिकेश पाटील, मनोज धर्माधिकारी, तर पॅट्रियटकडून नीलेश मस्कर, महेश सुतार, नितीन पांढरे, रजत शेट्ये, सय्यद नेमुद्दीन यांनी अनेक संधी वाया घालवल्या. उत्तरार्धात दोन्ही संघांनी कंटाळवाणा खेळ केला. ५१ व्या मिनिटाला पॅट्रियटच्या साईप्रसाद वडणगेकरने गोल करत १-० अशी आघाडी मिळवून दिली. सार्ईनाथ स्पोर्टस्ने गोल फेडण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. ५४ व्या मिनिटांस साईनाथच्या वीरेंद्र जाधवने मैदानी गोल करत सामन्यात १-१ अशी बरोबरी आणली. अखेरपर्यंत दोन्ही संघांना सामन्यात आघाडी घेता आली नाही. अखेर सामना १-१ असा बरोबरीत राहिला. खेळाडूंमध्ये मारामारीशिवाजी विरुद्ध खंडोबा यांच्या सामन्यात शिवाजीचा आघाडीचा खेळाडू सागर भातकांडेला अवैधरीत्या अडविल्याबद्दल मुख्य पंचांनी विकी सुतारला रेडकार्ड दिले. त्याचवेळी विकी सुतारने सागर भातकांडेला मारहाण केली. यावेळी अन्य खेळाडूंनी हा प्रकार तेथेच थांबवत सामना पुन्हा सुरू केला. कोल्हापुरातील शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या ‘केएसए’ लीग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी खंडोबा विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ यांच्यात झालेल्या सामन्यातील एक क्षण.
दिवस बरोबरीचा !
By admin | Updated: December 18, 2014 00:31 IST