साल्वाडोर : डेव्हिन डी बूएन आणि रोमेलू लुकाकू यांनी अतिरिक्त वेळेत नोंदविलेल्या गोलमुळे बेल्जियमने बुधवारी पहाटे रोमहर्षक सामन्यात अमेरिकेला २-१ ने धूळ चारून फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. बेल्जियमने २७ वर्षांनंतर ही सर्वश्रेष्ठ कामगिरी बजावली. याआधी १९८६ साली या संघाने विश्वचषकाच्या उपांत्यफेरीत धडक दिली होती.शनिवारी उपांत्यपूर्व सामन्यात बेल्जियमला आव्हान असेल ते दोनवेळा विश्वचषक विजेत्या अर्जेंटिना संघाचे. या सामन्यात निर्धारित वेळेत उभय संघ गोलशून्यने बरोबरीत होते. अतिरिक्त वेळेत दुसऱ्याच मिनिटाला (९२ मिनिटे) डी ब्रुएन याने पहिला गोल नोंदविला. लुकाकूने त्याला हा पास दिला होता. १०६ व्या मिनिटाला स्वत: लुकाकूने बेल्जियमची आघाडी २-० अशी केली. यावेळी डी ब्रूएनने त्याला पास दिला. यामुळे बेल्जियमची उपांत्यपूर्व फेरी निश्चित मानली जात होती. पण अतिरिक्त वेळेतील दुसऱ्या हापमध्ये बायर्न म्यूनिचचा किशोरवयीन खेळाडू ज्युलियन ग्रीन बदली खेळाडू म्हणून मैदानात आला. त्याने आल्याआल्या अमरिकेचे खाते उघडताच पुन्हा चुरस वाढली. बेल्जियमवर मोठा दबाव आला होता. तणावपूर्ण सामन्यात जयपराजयाचे पारडे सारखे झुकत राहिले पण बेल्जियमच्या बचावफळीने अमेरिकेच्या स्ट्रायकर्सचा संपूर्ण ताकदीनिशी सामना केल्यामुळे सामन्यात बेल्जियमची सरशी झाली. (वृत्तसंस्था)
बेल्जियमचा मास्टरस्ट्रोक
By admin | Updated: July 3, 2014 04:46 IST