ऑनलाइन लोकमत
बेंगळुरु, दि. २२ - तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी अडचणीत आलेला भारताचा फिरकीपटू अमित मिश्राला दिलासा मिळाला आहे. संबंधीत तरुणीने अमित मिश्राविरोधातील तक्रार मागे घेण्याची तयारी दर्शवली असून अमित व मी मित्र आहोत आणि यापुढेही आम्ही मित्रच राहू असे तिने म्हटले आहे.
बेंगळुरुत राहणा-या एका तरुणीची गेल्या ४ ते ५ वर्षांपासून अमित मिश्राशी ओळख असून ते दोघेही सातत्याने भेटत होते. गेल्या आठवड्यात मिश्रा क्रिकेट कॅम्पसाठी बेंगळुरुत आलेल्या मिश्राला भेटण्यासाठी संबंधीत तरुणी त्याच्या हॉटेलमध्ये गेली होती. या दरम्यान दोघांमध्ये वाद झाला व अमित मिश्राने तिला मारहाण केली. यानंतर पिडीत तरुणीने बेंगळुरु पोलिसांकडे अमित मिश्रा विरोधात मारहाण व विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याप्रकरणात अमित मिश्राला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीसही बजावली होती. मात्र आता या तरुणीने मिश्राविरोधातील तक्रार मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे.
तक्रार दाखल केल्याच्या दोन दिवसांनंतर मी पोलिस ठाण्यात गेली होती, अमित मिश्रा पोलिस ठाण्यात कधी येईल याची मी वाट बघत आहे, आम्ही सामंजस्याने दोघांमधील वादावर तोडगा काढू शकतो असेही तिने सांगितले. कोणत्याही दबावाखाली हा निर्णय घेतलेला नाही असे तक्रारदार तरुणीने नमूद केले.