मुंबई : संपुर्ण स्पर्धेत धक्कादायक विजयाची नोंद करीत अंतिम फेरी गाठलेल्या इजिप्तच्या अली फरागने आपला लौकिक कायम ठेवत तृतीय मानांकित पाकिस्तानच्या नासीर इक्बालचा 3-2 असा पाडाव करीत दुस:या सीसीआय-पीएसए आंतरराष्ट्रीय स्क्वाश स्पर्धेचा विजयी चषक उंचावला.
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) येथे नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आपल्या वेगवान व आक्रमक खेळाने सर्वाचे लक्ष वेधून घेणा:या नासीरला संभाव्य विजेता मानले जात होते. मात्र अव्वल मानांकित सौरव घोषालला नमवून सनसनाटी सुरुवात करणा:या अली फरागने अंतिम सामन्यात देखील खळबळ माजवली.
पहिला सेट जिंकत आश्चर्यकारक आघाडी घेतलेल्या अलीला यानंतर सलग दोन सेट गमवावे लागले. या वेळी 2-1 अशा आघाडीवर असलेला नासीर सहज बाजी मारणार असे दिसत असताना पुन्हा एकदा अलीने आपल्या झुंझार वृत्तीने लढवय्या खेळ करीत तिस:या सेटमध्ये 11-1 असे निर्विवाद वर्चस्व राखत सामना निर्णायक पाचव्या सेटमध्ये नेला. अंतिम सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ करीत सामन्याची रंगत कमालीची वाढवली. मात्र विजेतेपद आपल्या हातून निसटणार नाही याची योग्य खबरदारी घेताना अलीने 11-7, 7-11, 5-11, 11-1, 11-9 असा धक्कादायक निकाल नोंदवताना विजेतेपदावर नाव कोरले. (क्रीडा प्रतिनिधी)