अजित मांडके ल्ल ठाणेठाणे महापालिकेचा कर्ज बुडव्यांचा एरीया म्हणून प्रभाग क्रमांक १४ कडे पाहिले जाते. या प्रभागात इमारती कमी असून चाळी आणि अनधिकृत बांधकामांचा भरणा आहे. सोईसुविधांपासून हा प्रभाग वंचित असून आरोग्य केंद्र नाही. रस्ते आहेत, परंतु ते निमुळते असल्याने या प्रभागताही मोठी वाहने जाणे अवघडच आहे. शौचालय, गार्डन, आदींसह इतर सुविधांचीदेखील वानवा आहे.प्रकर्षाने भेडसावणारी समस्या म्हणून, पाण्याच्या समस्येकडे आजही पाहिले जाते. २००२ मध्ये, या भागाला १७ दशलक्षलीटर पाणी मिळत होते. परंतु, आता ५७ दशलक्ष लीटर पाणी मिळूनही आजही येथे उंच भागांना कमी दाबाने पाणी येत आहे. विशेष म्हणजे १० ते २० तासांच्या फरकाने पाणी येणे आवश्यक असतांना येथे, ३० ते ३५ तासांच्या अवधीने पाणीपुरवठा केला जात असून तो देखील अवेळी होत असल्याने येथील रहिवासी हैराण आहेत. महापालिकाच नव्हे अनेक बँकाचे कर्ज घेऊन न फेडणाऱ्यांमध्ये हा प्रभाग आघाडीवर असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे बहुतेक बँकांनी या प्रभागाची ओळख एनपीए एरिया अशीच केली आहे. या प्रभागावर सध्या राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. या प्रभागाची लोकसंख्या ३० ते ३५ हजार असली तरी येथील मतदारांची संख्या, १९ हजार ८४० एवढी असून येथे ६० टक्के झोपडपट्टी आणि ४० टक्के इमारती येथे आहेत. लोकमान्य पाडा नं. २, मैत्री पार्क, नंदा पार्क, लक्ष्मी पार्क फेज २, शिवकृपा सोसायटी, झांजे नगर, गणपती मंदिर परिसर, गणेश दर्शन अपार्टमेंट, ठाकूर कॉमप्लेक्स, ठाकूर विद्यालय आदी परिसर येथे येतात. दुसरीकडे रस्त्यांची अवस्था देखील फारशी चांगली नसून अतिशय दाटीवाटीने येथे रहिवासी वास्तव्य करतांना दिसतात. रस्ते अरुंद असल्याने टेकडीपर्यंत रिक्षा अथवा इतर वाहने जात नाहीत. त्यात सर्व भागात अतिक्रमण अथवा अनधिकृत बांधकामे वाढल्याने याठिकाणी मैदान, गार्डन या सुविधांची देखील वानवा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था देखील फारशी चांगली नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. शौचालयांच्या दुरुस्ती झाली असली तरी ५० शौचालयांच्या सफाईसाठी केवळ एकच व्यक्ती असल्याने ती वेळेवर होत नाही. त्यात येथे रात्री ८ नंतर महिलांचे रस्त्यावर येण्याचे प्रमाण फारच कमी असून येथे रात्री एकट्या दुकट्या फिरणाऱ्या महिलांना चोरट्यांची भीती वाटते. त्यात येथे पोलीस चौकी देखील नसल्याने चोरांनी देखील येथे आपली दहशत कायम ठेवली आहे. त्यातही येथे स्मशानभूमी नसल्याने येथील नागरिकांना थेट कामगार रुग्णालय परिसरात असलेल्या स्मशानभूमीकडे जावे लागते. रस्ते असले तरी काही भागात सिमेंट रस्ते होणे अपेक्षित आहे. तसेच अरुंद रस्त्यामुळे साधी अॅम्ब्युलन्स वरपर्यंत जाऊ शकत नाही. रस्ते, गटार, पायवाटा, शौचालयांची कामे केलेली आहेत. पाण्याचीही समस्या सोडविलेली आहे. मात्र, आजही या भागात हवे त्या प्रमाणात पाणी मिळत नाही. १८ ते २० तासांच्या फरकाने पाणी यावे अशी आमची मागणी आहे. परंतु,आजही ती पूर्ण होऊ शकलेली नाही. - हणमंत जगदाळे, स्थानिक नगरसेवक, राष्ट्रवादीया प्रभागाला कर्ज बुडव्यांचा एरिया म्हणून ओळखले जाते. परंतु येथे समस्या अधिक आहेत. पाणी, शौचालय, गार्डन, मैदान आदींसह इतर मुलभूत सुविधांसाठी येथील नागरीकांना झगडावे लागत आहे.- सचिन मोरे, स्थानिक नागरीकरस्ते अरुंद असल्याने मोठी वाहने तर उंच भागात जात नाहीत, त्यात रिक्षावाले देखील लोकमान्य डेपोजवळच सोडत असल्याने, डेपोपासून टेकडीपर्यंत जवळ - जवळ एक ते दिड किमीचे अंतर पायीच कापावे लागत आहे.- किरण वाघ, स्थानिक नागरीक
३० ते ३५ तासांनी पाणी; तेही अनियमित
By admin | Updated: January 20, 2015 00:07 IST